पारंपरिक पक्ष व स्थानिक उमेदवारांकडेही दुर्लक्ष
By admin | Published: October 19, 2014 10:15 PM2014-10-19T22:15:40+5:302014-10-20T00:14:37+5:30
पारंपरिक पक्ष व स्थानिक उमेदवारांकडेही दुर्लक्ष
नाशिक : नाशिक मध्य मतदारसंघामधील जुने नाशिक, वडाळागाव परिसरात दलित, मुस्लीम मतदारांचे प्रमाण इतर मतदारसंघांच्या तुलनेत अधिक असल्याचे मानले जाते. दलित-मुस्लीम हा वर्ग नेहमीच कॉँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाबरोबर जातो असे समीकरण आजपर्यंत राजकीय वर्तुळात लावले गेले; मात्र यंदाच्या निवडणुकीत मुस्लीम व दलित मतदारांनी पारंपरिक राजकीय पक्ष सोडण्याबरोबरच जुन्या नाशकातून निवडणूक रिंगणात उतरलेले कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थानिक उमेदवारांकडेही पाठ फिरविली.
गेल्या अनेक वर्षांपासून जुने नाशिक परिसराकडे गावठाण म्हणून सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मूलभूत सोयीसुविधा मिळविण्यासाठी आजही येथील नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचे आव्हान नाशिक मध्य मतदारसंघातील भाजपाच्या विजयी उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासमोर राहणार आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या भागातील मतदारांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडे दुर्लक्ष करत मनसेच्या इंजिनवर स्वार होणे पसंत केले होते; मात्र गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये मध्य नाशिक मतदारसंघातील जुने नाशिक, वडाळागाव परिसराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास घडून आला नाही तसेच येथे आवश्यक त्या सोयीसुविधादेखील उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. मनसेची सत्ता येऊनही डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचादेखील कायापालट होऊ शकला नाही. त्यामुळे मतदारांनी बदल घडवून आणत कॉँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांबरोबरच मनसेवरदेखील विश्वास दाखविणे पसंत केले नाही व भाजपा पक्षाच्या महिला उमेदवाराच्या बाजूने कौल दिला. एकूणच या मतदारसंघाच्या लागलेल्या निकालामध्ये या भागातील मतदान निर्णायक ठरले आहे. (प्रतिनिधी)