अलंगुण : सुरगाणा येथील सेतू सेवा केंद्रात कोणतेही कागदपत्र सादर न करता राजरोसपणे रेशनकार्डचे अवैद्य रॅकेट चालत असून गोरगरीब, आदिवासी बांधवांना एपीएल व बीपीएलचे अवैद्य रेशनकार्ड वितरित केले जात आहेत. असा आरोप डीवायएफआय संघटनेने तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.याबाबत सोमवारी (दि. १७)तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येथील सेतू सेवा केंद्रात नविन शिधा पत्रिका मागणीचे कोणतेही कागदोपत्री पुरावे सादर न करता अगदी सहजपणे एपीएल व बीपीएल रेशनकार्ड आदिवासी गोरगरीबांना वितरित केले जात आहेत.या वितरित केलेल्या शिधापत्रिकेची कार्यालयीन दप्तरी नोंद केली जात नसून त्याचे आॅनलाईनही केले जात नाही. त्यामुळे असे रेशनकार्ड हे अवैद्य ठरत असून भविष्यात अशा शिधा पत्रिका बेकायदेशीर ठरवून रद्द केल्या जातील अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे. सर्व पुरावे तपासून मगच अधिकृतपणे विभक्त व दुय्यम शिधा पत्रिका गरजवंतांना देण्यात यावी अशी मागणी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाने केली आहे.या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समितीचे उपसभापती इंद्रजीत गावित, देविदास हाडळ, रमेश वाडेकर, योगेश जाधव, रामभाऊ थोरात, यशवंत कोदे, मोनिका पवार, भारती पवार, शैलेश राऊत, सुरेश घाटाळ, आनंदा चौधरी आदींच्या सह्या आहेत.