फिरत्या पोलीस ठाण्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:31 AM2018-07-03T01:31:03+5:302018-07-03T01:31:31+5:30
ग्रामीण पोलीस दलातील गस्ती पथकांसाठी जीपीएस प्रणालीसह सुसज्ज वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला असून, या पथकाच्या साहाय्याने जिल्ह्यातील ४० पोलीस ठाण्यांमध्ये ‘फिरते पोलीस ठाणे’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ओझर विमानतळावर या उपक्रमाचा सोमवारी (दि़ २) शुभारंभ करण्यात आला़
नाशिक : ग्रामीण पोलीस दलातील गस्ती पथकांसाठी जीपीएस प्रणालीसह सुसज्ज वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला असून, या पथकाच्या साहाय्याने जिल्ह्यातील ४० पोलीस ठाण्यांमध्ये ‘फिरते पोलीस ठाणे’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ओझर विमानतळावर या उपक्रमाचा सोमवारी (दि़ २) शुभारंभ करण्यात आला़ महाराष्ट्र शासन जिल्हा नियोजन व विकास समितीच्या योजनेंतर्गत ग्रामीण पोलीस दलास मिळालेल्या जीपीएस प्रणालीने सुसज्ज गस्ती पथकातील वाहनांच्या ताफ्यामुळे ग्रामीण पोलीस हद्दीत अचानक उद्भवलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, अपघात, वाहतूक कोंडी, नागरिकांच्या विविध तक्रारी, सुरक्षिततेची हमी, कार्यक्षम पोलिसिंग व तंतोतंत कार्यवाहीसाठी जीपीएसच्या साहाय्याने संबंधित ठिकाणी मदत पोहोचविणे शक्य होणार आहे़ याबरोबरच महिलांवरील अत्याचार, सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त, जबरी लुटमारी आणि बँक संबंधित आर्थिक गुन्हे व सोशल मीडियाद्वारे होत असलेले प्रकार हे लक्षात येताच तातडीने संबंधितांवर शोध घेऊन कारवाई करणे गरजेचे असते. अशा वेळी जीपीएस यंत्रणा उपयुक्त ठरते. या यंत्रणेला जिह्णातील चाळीस पोलीस ठाणे जोडण्यात आली आहेत. ओझर विमानतळावर झालेल्या या समारंभाप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आणि मान्यवर उपस्थित होते. प्र्रारंभी मान्यवरांचे स्वागत विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे व जिल्हा अधीक्षक संजय दराडे यांनी केले.
४० पोलीस ठाणे हद्दीत फिरते पोलीस ठाणे
च्ग्रामीण भागातील जनतेशी थेट संवाद, लहान असो वा मोठी तक्रार तत्काळ दाखल करून घेत कारवाई, पोलिसांबद्दलची भीती दूर करणे, अवैध धंद्यांचे उच्चाटन ही कामे फिरत्या पोलीस ठाण्यामार्फत केली जाणार आहेत़ याबरोबरच महिला सबलीकरणासाठी महिलांविषयक कायदे व धोरणांच्या जनजागृतीचे कामही हे पोलीस करणार आहेत़