नाशिक : नाट्यस्पर्धा हा महत्त्वाचा स्रोत असून, राज्य नाट्यस्पर्धा व्यावसायिक रंगभूमीचे द्वार असल्याने प्रत्येक कलावंताने राज्य नाट्यस्पर्धेत सादरीकरण करणे महत्त्वाचे आहे, असे मत अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह व अभिनेते दीपक करंजीकर यांनी सोमवारी (दि. ६) ५७ व्या राज्य हौशी नाट्यस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५७ व्या राज्य हौशी नाट्यस्पर्धेचे परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे अभिनेते दीपक करंजीकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले. नाट्यस्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान नाशिकचे ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांना पन्नास वर्षे रंगमंचाच्या केलेल्या साधनेबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दत्ता पाटील यांनी दत्ताजी भोईर यांना देण्यात येणाºया सन्मानपत्राचे वाचन केले. तसेच स्पर्धकांना उद्देशून बोलताना त्यांनी कलावंतांनी परीक्षकांना निकाल देताना बुचकळ्यात पाडतील अशा प्रयोगाचे सादरीकरण करण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर सावानाचे नाट्यगृह सचिव धर्माजी बोडके, स्पर्धेचे परीक्षक वसंत सामदेकर, डॉ. रमेश थोरात, अनुया बाम, अभिनेत्री विद्या करंजीकर, अरुण गिते, मीना वाघ आणि राजेश जाधव उपस्थित होते. यावेळी नेताजी भोईर यांना संपूर्ण नाट्यगृहाने उभे राहून अनोखी मानवंदना दिली.
राज्य नाट्यस्पर्धेचे दिमाखात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:45 AM