मिळकत सर्वेक्षण, उद्यान देखभालीचा प्रस्ताव मार्गी
By Admin | Published: October 14, 2016 12:44 AM2016-10-14T00:44:45+5:302016-10-14T01:29:01+5:30
स्थायी समिती : वृक्षगणनेच्या प्रस्तावालाही मंजुरी
नाशिक : शहरातील चार लाख ६० हजार मिळकतींचे सर्वेक्षण करण्याबरोबरच २२९ उद्यानांच्या देखभालीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. याशिवाय, न्यायालयाच्या निर्देशानुसार अत्याधुनिक संगणकीय पद्धतीने शहरातील वृक्षांची गणना करण्याचा महत्त्वपूर्ण विषयही मार्गी लावण्यात आला.
स्थायी समितीच्या सभेत सभापती सलीम शेख यांनी या प्रस्तावांना कोणतीही चर्चा न करत मंजुरी दिली. प्रशासनाने घरपट्टीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून सदरचा प्रस्ताव निविदाप्रक्रियेत अडकला होता. अखेर प्रशासनाने मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे काम मे. जिओ इन्फोसिस टेक्नॉलॉजी यांच्याकडून करून घेण्यास आणि त्यासाठी चार कोटी दोन लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायीवर ठेवला होता. स्थायीने सदर प्रस्तावाला मान्यता दिल्याने शहरातील मिळकतींच्या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यात अनेक करबुडव्या मिळकतीही समोर येण्याची शक्यता आहे. स्थायीच्या सभेत प्रशासनाने शहरातील २२९ उद्यानांच्या देखभालीसाठीचेही प्रस्ताव ठेवले होते. त्यात गंगापूर गावाजवळील कै. वसंत कानेटकर वनौषधी उद्यानाचा समावेश होता.