पंचवटी : पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे शुक्रवारी (दि. ८) यंदाच्या पावसाळ्यात गोदामाई प्रथमच खळाळून वाहिली, तसेच परिसरातील छोट्या रस्त्यांवरून पाणी ओसंडून वाहत होते. त्यामुळे पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या परजिल्ह्यातील भाविकांचे पावसामुळे चांगलेच हाल झाले. यंदा पावसाळ्यात प्रथमच गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे रामकुंड परिसरातील व्यवसाय ठप्प पडले होते. अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवणे पसंत केले. पावसामुळे परिसरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. पावसामुळे रस्ते, नाले तुडुंब भरून वाहत होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंचवटीत पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते. शाळा सुटल्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांना भर पावसात भिजत घराकडे मार्गक्रमण करावे लागले. जुना आडगाव नाका, दिंडोरी रोड, गजानन चौक परिसरात पाणी साचल्याचे दिसून आले. पावसामुळे नागरिकांना छत्री रेनकोट घेऊन घराबाहेर पडावे लागले.
संततधारेमुळे गोदावरीच्या पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2022 1:41 AM