यंदा सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:04+5:302021-06-16T04:18:04+5:30
मागील पाच ते सहा दिवसांपासून येवला तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, जळगाव नेउर, सत्यगाव, पिंपळगाव लेप, शिरसगाव ...
मागील पाच ते सहा दिवसांपासून येवला तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, जळगाव नेउर, सत्यगाव, पिंपळगाव लेप, शिरसगाव लौकी आदी परिसरात कडाक्याचे ऊन पडत असून, पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पुढील चार ते पाच दिवसांत असेच कडक ऊन पडत राहिल्यास केलेल्या पेरण्या पावसाअभावी धोक्यात येणार आहेत. दरवर्षी येवला तालुक्यातील बहुतांश भागात ७ जूननंतर खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांना सुरुवात केली जाते. यंदा मात्र जूनचा अर्धा महिना संपत आला तरी पश्चिम भागात मुसळधार पाऊस नसल्याने पेरण्यांना अद्याप सुरुवात झालेली नाही. शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेली असून, खते, बियाणे खरेदी करण्याची लगबग शेतकरीवर्गात सुरू आहे.
इन्फो
पूर्व भागात पेरण्यांना वेग
येवला तालुक्यातील पूर्व भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून, खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. पूर्व भागातील राजापूर, अंदरसुल, कोटमगाव, सावरगाव, नायगव्हान आदी परिसरात पेरणीच्या कामात शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. येवला तालुक्यात साधारणपणे खरीप हंगामातील २० टक्केपर्यंत पेरण्या झाल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
कोट...
मागील दहा ते बारा दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्यानंतर आम्ही मका पेरणी केली आहे. मात्र, आता पाच ते सहा दिवसांपासून पाऊसच गायब झाल्याने खर्च करून केलेल्या पेरण्या संकटात सापडल्या आहेत.
- स्वप्नील कोटमे, शेतकरी, कोटमगाव खुर्द
कोट...
शिरसगाव परिसरात मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर केवळ शेतीची मशागत पूर्ण झाली आहे. जून महिना अर्धा संपत आला असून, अद्याप मुसळधार पाऊस न पडल्याने आम्ही खरीप हंगामातील कोणत्याही प्रकारच्या पिकांची पेरणी केलेली नाही.
कल्याण कोटकर, शेतकरी, शिरसगाव लौकी.