मालेगाव : राज्यात कार्यरत असलेल्या ३० हजार पोलीस पाटलांना शासनाने १५ हजार रुपये मानधन द्यावे, पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६० ऐवजी ६५ करावे, सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी महाराष्टÑ राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव नागरगोजे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील पुढे म्हणाले की, २०१४ साली पोलीस पाटलांचे राज्यस्तरीय संमेलन झाले. या संमेलनात पोलीस पाटलांना साडेसात हजार रुपये मानधन दिले जाईल अशी घोषणा तत्कालीन गृहराज्यमंत्री आर. आर. पाटील यांनी केली होती. मात्र राज्यातील सत्तांतरामुळे पोलीस पाटलांच्या मानधनातील वाढ रखडली होती. गेल्या २६ नोव्हेंबर रोजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र समितीने केवळ दीड हजार रुपयांची मानधन वाढ सुचवली आहे. ही वाढ अन्यायकारक आहे. सध्या ३ हजार रुपये तुटपुंजे मानधन मिळत आहे. पोलीस पाटलांना १५ हजार रुपये मानधन वाढ द्यावी. सेवानिवृत्ती वेतन लागू करावे, गाव पातळीवर कार्यालय सुरू करावे अन्यथा शासनाच्या विरोधात जिल्हानिहाय आंदोलन छेडण्याचा निर्धार महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.पत्रकार परिषदेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास बच्छाव, तालुकाध्यक्ष अरुण जगताप, जिल्हा संघटक रविंद्र खैरनार, शरद अहिरे, स्वप्नील शेलार आदि उपस्थित होते.
पोलीस पाटलांचे मानधन वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 6:08 PM