नायगाव खोऱ्यात गव्हाच्या लागवड क्षेत्रात वाढ हवामानात बदल : कांद्याच्या बियाण्यांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:26 AM2020-12-03T04:26:02+5:302020-12-03T04:26:02+5:30
नायगाव खोऱ्यातील नायगाव,जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राम्हणवाडे, मोह-मोहदरी, सोनगिरी व जोगलटेंभी आदी शिवारात सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे. यंदा ...
नायगाव खोऱ्यातील नायगाव,जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राम्हणवाडे, मोह-मोहदरी, सोनगिरी व जोगलटेंभी आदी शिवारात सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे. यंदा खोऱ्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. असे असले तरी अति पावसामुळे कांदा रोपांचे नुकसान व कांदा बियाण्यांची निर्माण झालेली टंचाई त्यातच खराब हवामानामुळे कांदा लागवडीचे क्षेत्र सुमारे चाळीस टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे यावर्षी परिसरात गव्हाच्या क्षेत्राबरोबर अन्य पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
कांद्याचे आगार म्हणून नायगाव खोऱ्याची ओळख जिल्हाभरात आहे. याच आगारातून विविध कारणांमुळे कांदा पीक हळूहळू हद्दपार होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या विविध भाजीपाल्यांसह गव्हाच्या पिकाला शेतकरी पसंती देताना दिसत आहेत.
कांद्याच्या क्षेत्रात घट
शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात हमखास आर्थिक आधार देणारे पीक म्हणून कांदा पिकाकडे बघितले जाते. यंदा मात्र नायगाव खोऱ्यात कांद्याचे क्षेत्र विविध कारणांमुळे जवळपास चाळीस टक्क्यांनी घटले आहे. रिकाम्या पडलेल्या क्षेत्रावर सध्या गव्हासह भाजीपाल्याची लागवड होताना दिसत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा नायगाव खोऱ्यातील कांदा क्षेत्रात पस्तीस ते चाळीस टक्के घट होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. गव्हाच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा किंचीतशी वाढ होण्याचे चित्र सध्या दिसत आहे. कांदा पिकाचे नियोजन कोलमडले असले तरी अजूनही शेतकरी बियाणे शोधून कांदा पेरणी करताना दिसत आहेत.
- सचिन भगत
कृषी सहायक, जायगाव.
===Photopath===
021220\02nsk_25_02122020_13.jpg
===Caption===
नायगाव खो-यात पिकांच्या लागवडीसाठी बैलांच्या साहाय्याने शेतीची मशागत करतांना शेतकरी.०२ नायगाव १