युतीच्या इच्छुकांची वाढली घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:51 AM2019-09-23T00:51:34+5:302019-09-23T00:52:08+5:30

विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन नामांकन दाखल करण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाही भाजप-सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा व त्याचबरोबर जागावाटपाची बोलणी पूर्ण होत नसल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुकांची घालमेल वाढली आहे.

 Increased integration of coalition aspirants | युतीच्या इच्छुकांची वाढली घालमेल

युतीच्या इच्छुकांची वाढली घालमेल

googlenewsNext

नाशिक : विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन नामांकन दाखल करण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाही भाजप-सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा व त्याचबरोबर जागावाटपाची बोलणी पूर्ण होत नसल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुकांची घालमेल वाढली आहे. जागा वाटपानंतरही ज्या मतदारसंघांमध्ये फेरबदलाची शक्यता आहे अशा मतदारसंघातील इच्छुकांना तर युती झाल्यास बरे, नाही झाले तर आणखी बरे असे वाटू लागले आहे.
लोकसभा निवडणूक एकत्रित लढलेल्या भाजप-सेनेत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय तणाव निर्माण झाला होता. परंतु अखेरच्या क्षणी युतीची घोषणा करून भाजप मोठा भाऊ, तर सेना लहान भाऊ म्हणून एकमेकांच्या साथीने निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपला सेनेपेक्षाही अधिक यश मिळाल्याने प्रत्यक्ष केंद्रीय मंत्रिमंडळात सेनेच्या वाट्याला एकच मंत्रिपद मिळाल्याने सेनेत नाराजी व्यक्त केली. अशा परिस्थिती विधानसभा निवडणुकीत युती होते किंवा नाही अशी चर्चा गेल्या तीन महिन्यांपासून झडत असून, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मात्र युती होणारच असा दावा करीत असताना दुसरीकडे मात्र एकमेकांना अटी, शर्ती घालत आहेत. त्यामुळे अधून मधून युतीत ठिणग्या उडू लागल्या आहेत. सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रा काढून राज्यातील जनतेकडे ‘मला आशीर्वाद देणार का’ असा सवाल करून आगामी राजकीय वाटचालीचे संकेत दिलेले तर जागोजागी त्यांच्या नावे ‘महाराष्टÑाचे भावी मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टर्सही लावले गेले आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीची घोषणा होवूनही युतीची घोषणा व जागावाटप होत नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर अनेकांना संधी मिळू शकते मात्र युती झाली तर अनेकांना आहे तेथेच थांबावे लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात २००९च्या जागावाटपात सेना मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरल्याने जागावाटपात त्यांना दहा जागा, तर भाजप लहान असल्यामुळे त्यांना पाचच जागा देण्यात आल्या. गेल्या निवडणुकीत मात्र युती नसल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले चालू निवडणुकीत नेमके कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे अद्याप स्पष्ट होत नाही. भाजपने जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील सुमारे १७५ इच्छुकांच्या मुलाखती यापूर्वीच घेतल्या असून, सेनेनेही सर्वच मतदारसंघाचा आढावा घेऊन राजकीय गणिते तपासून पाहिली आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांनी युती न झाल्यास लढण्याची तयारी केली असली तरी, अजूनही युती होईलच अशी दोन्ही पक्षांच्या इच्छुकांना वाटत आहे. विद्यमान परिस्थितीत पक्षाच्या आमदाराचे मतदारसंघ त्या पक्षाला सुटण्याची शक्यता असली तरी, नाशिक पश्चिम, नांदगाव, कळवण या तीन मतदारसंघाबाबत दोन्ही पक्षांकडून आग्रह आहे.
अर्ज भरण्यास अवघे पाच दिवस
निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करून निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. २७ सप्टेंबरपासून अर्ज दाखल केले जाणार आहेत. म्हणजेच पाचच दिवस शिल्लक असून, अशा परिस्थितीत युती व जागांची घोेषणा झाल्यास इच्छुकांना नामांकनासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यास कमी अवधी मिळणार आहे. परंतु हातावर हात ठेवण्यापलीकडे कोणताही पर्याय शिल्लक दिसत नाही.

Web Title:  Increased integration of coalition aspirants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.