नाशिक : कोविडमुळे अनाथ झालेल्या किंवा एक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. तसेच हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणत त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, त्यांच्या स्वप्नांना साकारण्यासाठी सक्षम करण्याचे ध्येय निश्चित करून ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील ५० हून अधिक दुर्दैवी विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूर भूकंपातील १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० विद्यार्थी असे मागील ३० वर्षात एकूण ३००० विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन पूर्ण करून त्यांना एक कर्तबगार, जबाबदार व संवेदनशील नागरिक बनविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे. आता भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कोविडमुळे आई-वडिलांचे किंवा वडिलांचे किंवा आईचे छत्र हरपलेल्या इ. ५ वी ते १२ वीपर्यंत मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यममध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांची यादी घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुणे येथे त्यांना शिक्षणासाठी पाठविण्याकरिता पालकांची संमती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात येणार आहे. बीजेएसच्या वाघोली, पुणे येथील शैक्षणिक संकुलातील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इ ५ वी ते ११ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येणार असून त्याच संकुलात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नाश्ता, भोजन, खेळ, अधिकचा अभ्यास, आरोग्य सेवा, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, विविध प्रकारच्या स्पर्धा इत्यादी सर्व बाबींची व्यवस्था उपलब्ध राहणार आहे. राज्यशासनाने शाळा व वसतिगृह सुरू केल्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पुढील शिक्षणासाठी त्यांना वाघोली पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती बीजेएसचे राज्य प्रभारी नंदकिशोर साखला, प्रकल्प प्रमुख दीपक चोपडा यांनी दिली. सदर प्रकल्पासाठी बीजेएस संस्थापक शांतीलाल मुथ्था, राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल्ल पारख, यतिश डुंगरवाल, ललित सुराणा, अभय ब्रह्मेचा, गोटू चोरडिया, अमित बोरा, गौतम हिरण, रोशन टाटीया, संदीप ललवाणी, रवी चोपडा, अतुल आचलिया, पंकज साखला, लोकेश कटारिया, मनीष शहा, संतोष चोरडिया आदी कार्यरत आहेत. अधिक माहिती साठी ८८३०७४२८०८ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----------------------
इन्फो
जिल्ह्यात १४ बालकांनी गमावले दोन्ही पालक
जिल्ह्यात एकूण १४ बालकांनी दोन्ही पालक गमावले असून, १ ते १८ वयोगटातील एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या २८९ आहे. त्या २८९ मधील २७४ बालकांना पितृशोक तर १५ बालकांना मातृशोक सहन करावा लागला. त्यामुळे दोन्ही पालक गमावलेली बहुतांश मुले तसेच एक पालक गमावलेल्या बालकांमधून वाघोलीला राहून शिक्षणासाठी तयार असलेल्या एकूण सुमारे ५० मुलांना नाशिकहून पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. आतापर्यंत ६ बालकांच्या कुटुंबीयांनी होकार दर्शवला असून, संबंधितांच्या घरांपर्यंत पोहोचून त्यांच्या परवानगीनंतर बालकांची अत्यंत चांगल्या दर्जाची शैक्षणिक आणि निवासासह सर्व जीवनावश्यक बाबींची सोय केली जाणार आहे.
नंदकिशोर सांखला, राज्य प्रभारी, बीजेएस
---------
फोटो
१९नंदकिशोर सांखला