शिरवाडे वणी : येथील परिसरात उन्हाळ्याचा वाढत्या तीव्रतेमुळे द्राक्ष वेलींवर खोड किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक हैराण झाले आहे. त्याचा परिणाम द्राक्षाच्या उत्पादन खर्चावर होत आहे.मागील वर्षापासून कोरोना रोगाने थैमान घातले असल्यामुळे यावर्षीचा द्राक्षाचा हंगाम द्राक्ष उत्पादकांना समाधानकारक असाच गेला. तसेच द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, त्यातच द्राक्ष वेलींवर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढत चालली आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून दीर्घ कालावधीनंतर रणरणत्या उन्हाबरोबरच वन्यजीव प्राण्यांबरोबरच नागरिकांचीसुद्धा काहिली होत आहे. उन्हाचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे द्राक्ष वेलीवर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.उन्हाच्या तीव्र माऱ्यामुळे खोड अळी ही वेलींच्या खोडाला छिद्र पाडून आतून वेलींच्या मुळाकडून पानांना अन्नसाठा पुरविणारा भागच पोखरून भुशाच्या रूपाने तो त्या छिद्रातून बाहेर टाकताना दिसत आहे. खोडकिडीच्या या उपद्रवामुळे द्राक्षवेल ही आतून पोकळ होऊन पानांना अन्नसाठा न मिळाल्यामुळे निस्तेज व निकामी होऊन पाने पिवळी पडणे, काडी व्यवस्थित तयार न होणे, वेलीला माल कमकुवत निघणे, वेलीला माल आल्यानंतर घडांचे पोषण न होता कुपोषित झाल्याचे प्रकार घडणे, परिणामी द्राक्ष वेली कमकुवत होऊन उत्पादन खर्च वाढून उत्पन्न कमी मिळते.खोड अळी ही द्राक्षवेलीच्या बुडापासून ते शेंड्यापर्यंत कोणत्याही ठिकाणी छिद्र पाडून पोखरण्याचे काम चालू करीत असते. खोड अळीच्या नियंत्रणासाठी अतिशय महागड्या स्वरूपाचे औषधे ठिबक सिंचनमधून सोडावी लागतात अथवा छिद्र पाडलेल्या ठिकाणाहून इंजेक्शनद्वारे औषध सोडून त्यांचा नायनाट करावा लागतो. त्याचा परिणाम उत्पादनाचा खर्च वाढीवर काही प्रमाणात होत असतो, यात शंकाच नाही.शक्यतो खोड अळीचा प्रादुर्भाव हा द्राक्षाची काढणी झाल्यानंतर अथवा तीव्र उन्हाळ्यातच जाणवत असतो. खोड अळीचा बंदोबस्त वेळीच न केल्यास कालांतराने जास्त वाढल्याने द्राक्षवेली समूळ काढण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर येत असते. द्राक्षाची लागवड झाल्यापासून किमान दोन वर्षांनंतरपासून अळीचा हा प्रादुर्भाव सुरू होत असतो व खोड अळीचे नियंत्रण आटोक्यात न आल्यास ४ ते ५ वर्षांची वेल असतानादेखील उत्पादन क्षमता कमी झाल्याने द्राक्ष वेली काढून त्या ठिकाणी नवीन लागवड करावी लागत असते.परिणामी खर्चात वाढ होत असते. मागील दोन महिन्यांच्या तुलनेत सध्यातरी उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे द्राक्ष वेलीवर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक हैराण झाले आहेत. (०५ ग्रेप्स)
द्राक्ष वेलींवर खोडकिडीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 6:49 PM
शिरवाडे वणी : येथील परिसरात उन्हाळ्याचा वाढत्या तीव्रतेमुळे द्राक्ष वेलींवर खोड किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक हैराण झाले आहे. त्याचा परिणाम द्राक्षाच्या उत्पादन खर्चावर होत आहे.
ठळक मुद्देशिरवाडे वणी परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ