दिंडोरी पंचायत समितीतील अनियमिततेबाबत चौकशी गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:12 PM2020-12-16T16:12:18+5:302020-12-16T16:14:17+5:30
पत्रप्रपंच : पाच महिन्यांनंतरही कार्यवाही नाही
वणी : दिंडोरी पंचायत समितीतील कार्यप्रणालीबाबत अनियमितता असल्याची बाब उघड झाल्यानंतर पाच महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटूनही जिल्हापरिषदेने अद्याप चौकशी अहवाल विभागीय आयुक्ताकडे सुपुर्द केलेला नाही. त्यामुळे हतबल विभागीय कार्यालयाने अद्यापपावेतो ४ लेखी पत्र जिल्हा परिषदेला पाठविली आहेत.
दिंडोरी पंचायत समितीतील ११ ग्रामसेवक नियुक्तीच्या ठिकाणी कार्यरत न राहता दुसऱ्या गावात कार्यरत असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली होती. विशेष म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांनी या बाबीकडे कानाडोळा केल्याने सदरअधिकारी , विस्तार अधिकारी ,कक्ष अधिकारी ,लिपिक हे सर्व चौकशीच्या फेऱ्यात सापडले. याबाबत तक्रारदाराने लेखी स्वरुपात तक्रारी केल्या व त्याचा पाठपुरावा केला. जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविन्द्र परदेशी यांचेकडे याबाबतची चौकशी करुन अहवाल सादर करण्याची जबाबदारी आहे. परंतु, तक्रार केल्यानंतर १५ दिवसाच्या कालावधीत त्याचे निराकारण करणे क्रमप्राप्त असल्याचे संकेत असताना पाच महिन्याचा कालावधी उलटुनही अद्याप अहवाल सादर झालेला नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पत्र प्रपंच सुरू आहे.