निरीक्षण केंद्र हवामान खात्याचा आधार
By Admin | Published: April 21, 2017 01:33 AM2017-04-21T01:33:40+5:302017-04-21T01:33:59+5:30
नाशिक : नागरिक पाऊस, ऊन, थंडीच्या तीव्रतेचा अंदाज बांधतात; मात्र हे सर्व कामकाज जबाबदारीने तापमापक यंत्रांचा अभ्यास करत त्याआधारे केले जाते.
नाशिक : अमुक मिलिमीटर पाऊस पडला, कमाल तपमानाचा पारा वर सरकला, किमान तपमानाचा पारा घसरला... यावरून सर्वसामान्य नागरिक पाऊस, ऊन, थंडीच्या तीव्रतेचा अंदाज बांधतात; मात्र हे सर्व कामकाज अत्यंत जबाबदारीने तापमापक यंत्रांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करत त्याआधारे केले जाते. पेठरोडवरील निरीक्षण केंद्रातही शहराचे ऊन, वारा, पाऊस, थंडी, आर्द्रता, दाब अशा सर्वच बाबींवर सूक्ष्म नजर ठेवली जाते. हवामान खात्याचे पान निरीक्षण केंद्रातील नोंदीशिवाय हालू शकत नाही.
उन्हाची तीव्रता व थंडीचा अन् पावसाचा जोर वाढला की, सर्वसामान्य नागरिकांना आठवण होते ती कमाल तपमान किती मोजले गेले? पाऊस किती झाला? थंडीचा पारा किती घसरला? या सर्व प्रश्नांची उकल करून घेण्याची. हवामान निरीक्षण केंद्राद्वारे सर्वसामान्यांच्या या प्रश्नांची उकल करून दिली जाते; मात्र यापुढेही जाऊन हवामानात घडणारे बदल व त्यांचे निरीक्षण आणि स्थिती हवाई वाहतूक नियंत्रकांना कळविली जाते. या माहितीच्या आधारेच हवाई वाहतूक सुरक्षितरीत्या प्रवाशांना सेवा देत असते.
ऊन, वारा, पाऊस, थंडीची तीव्रता, पातळी किंवा प्रमाण क से मोजले जात असेल अन् त्यावरून आकडे कसे सांगितले जात असतील याविषयीची जिज्ञासा बहुतांश लोकांच्या मनात असते. एकूणच ही सर्व मोजदाद करण्यासाठी एक स्वतंत्र शास्त्र उपलब्ध आहे. यासाठी पेठरोडवरील हवामान केंद्राला भेट देणे आवश्यक आहे. येथील कार्यालयालगत मोकळ्या जागेत सर्व तापमापक यंत्रे बसविण्यात आली आहे.डोळ्यांना नुसतीच यंत्रे जरी लावलेली दिसत असली तरी त्यामागे त्यांची उंची, यंत्र बसविण्याच्या पद्धती, दिशा, परस्परांमधील अंतर अशा सर्वच बाबींची दक्षता हवामानशास्त्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निरीक्षकांकडून घेतली गेली आहे. वेळोवेळी जाऊन किमान, तपमान, कमाल तपमानाचा पारा, आर्द्रता याच्या नोंदी निरीक्षकांकडून घेतल्या जातात.