दलबदलू पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारीबाबत धाकधूक
By admin | Published: October 14, 2016 12:33 AM2016-10-14T00:33:56+5:302016-10-14T00:38:07+5:30
पक्षनेतृत्वाची कसोटी : काही नगरसेवकांना मिळणार डच्चू
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहत असले तरी प्रभागरचना व आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वीच दुसरा घरोबा करणाऱ्या काही नगरसेवकांमध्ये उमेदवारीबाबत धाकधूक वाढली आहे. आता प्रभागरचना व आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुकांकडून दावेदारी केली जात असल्याने पक्षनेतृत्वाची विशेषत: सेना-भाजपाची कसोटी लागणार आहे. काही नगरसेवकांना उमेदवारी वाटपात बेदखल केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ-दहा महिन्यांपासून पक्षांतरे सुरू आहेत. त्यात महापालिकेतील सत्ताधारी मनसेला सर्वाधिक फटका बसला असून, मनसेच्या १४ विद्यमान नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी आणि माकपाच्या नगरसेवकांचा समावेश आहे. प्रभागरचना व आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वीच संबंधित नगरसेवकांनी दुसरा घरोबा केला. त्यात काहींनी भाजपात तर काहींनी सेनेत प्रवेश केला आहे.
पुन्हा उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने ही पक्षांतरे झाली असली तरी आता प्रत्यक्षात प्रभागरचना व आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सेना-भाजपातील इच्छुकांनी आपली दावेदारी सुरू केली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच पक्षात आलेल्या नगरसेवकांच्या उमेदवारीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. काही मातब्बर नगरसेवक सोडले तर अनेक नगरसेवकांची अवस्था बिकट मानली जात असून त्यांना पुन्हा उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षामार्फत निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना मेरीटवरच तिकीट दिले जाणार असल्याचे सेना-भाजपातील सूत्रांकडून सांगितले जात असून संबंधित नगरसेवकांना पुन्हा उमेदवारीचा शब्द दिला नसल्याचीही चर्चा केली जात आहे. त्यामुळे दलबदलू नगरसेवकांच्या नाडीचे ठोके वाढले असून त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)