ग्रामसेवकांना टॅँकरचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:41 PM2020-05-30T22:41:35+5:302020-05-30T23:55:37+5:30
वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे व पाणीटंचाईचे प्रमुख अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांची बैठक घेतली. त्यात टंचाईग्रस्त गावांसाठी टॅँकरचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे व पाणीटंचाईचे प्रमुख अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांची बैठक घेतली. त्यात टंचाईग्रस्त गावांसाठी टॅँकरचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गावात टंचाई परिस्थिती उद्भवल्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या दडपणाखाली ग्रामसेवकांना प्रस्ताव तयार करावा लागतो. अर्थात पडताळणीत पाण्याचे स्रोत आढळून आल्यास प्रस्ताव नामंजूर केला जातो. या पाण्याच्या स्रोतांवर ५/६ दिवस निघून गेले की, प्रस्ताव नव्याने तयार करण्यासाठी आणखी १०-१५ दिवस निघून जातात. एकीकडे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची कामे ठप्प पडली आहेत. अवघ्या दहा कामांपैकी फक्त चारच कामे अद्यापही प्रगतिपथावर आहेत, तर उर्वरित कामांना मंजुरीच दिलेली नाही. जी कामे अद्याप प्रगतीत आहेत असे दाखवले जात आहे. त्या कामांची मुदत संपली आहे.
बैठकीसाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक मंदाकिनी बर्वे, भागवत लोंढे, पी. आर. सोनवणे, एस. बी. पाडांगळे, वीज वितरणचे किशोर सरनाईक, तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी, सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले, हरसूलचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, प्रवीण निकम, मुख्याधिकारी योगेश मोरे आदी उपस्थित होते. सद्यस्थितीत तालुक्यात फक्त तीन गावे, ११ वाड्या-पाड्यांचे प्रस्ताव आले आहेत. सध्या शासकीय १ टँकरसह ४ खासगी असे पाच टँकर धावत आहेत. हे टँकर तहानलेल्या गावांची तहान भागवत आहेत.