सहा कोटी रुपयांच्या मशिनरीची परस्पर विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:08 AM2018-11-24T00:08:25+5:302018-11-24T00:20:38+5:30
कंपनीचे बनावट कागदपत्र तयार करून संशयितांनी कंपनीतील पाच कोटी ७० लाख रुपयांची मशिनरी व इतर साहित्य परस्पर विक्री केल्याचा प्रकार अंबड औद्योगिक वसाहतीतील डिन इंजिनिअरिंग कॉपोर्रेशन कंपनीत घडला आहे
नाशिक : कंपनीचे बनावट कागदपत्र तयार करून संशयितांनी कंपनीतील पाच कोटी ७० लाख रुपयांची मशिनरी व इतर साहित्य परस्पर विक्री केल्याचा प्रकार अंबड औद्योगिक वसाहतीतील डिन इंजिनिअरिंग कॉपोर्रेशन कंपनीत घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित राजू शंकर पवार, ज्ञानोबा जाधव, ए. जी. बांधेकर, प्रकाश बांधेकर, माधवी बांधेकर (पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात बनावट कागदपत्रे, सही-शिक्के तयार करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़
दिनेश सुभाष चंद्रा (४३,रा़ वसुंधरा, नेहती गार्डन, डीपीएस शाळेजवळ, महंमदवाडी, पुणे) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची अंबड औद्योगिक वसाहतीत डिन इंजिनिअरिंग कॉपोर्रेशन या नावाची कंपनी आहे. १७ मे २०१६ ते आजपावेतो वरील संशयितांनी संगनमत करून दिनेश चंद्रा यांचा विश्वास संपादन केला़ यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून बनावट कागदपत्रे तसेच कंपनीस लागणारे सही व शिक्केही तयार केले़ त्यानंतर ही कागदपत्रे खरी आहेत असे भासवून त्यांचा वापर केला़
संशयितांना अटक
संशयित ए. जी. बांधेकर, प्रकाश बांधेकर व माधवी बांधेकर यांनी कागदपत्रे, कंपनी मालक याबाबत शहानिशा न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीत बेकायदेशीररीत्या घुसून ५ कोटी ७० लाख रुपयांची मशिनरी व इतर साहित्याची परस्पर विक्री करून चंद्रा यांची आर्थिक फसवणूक केली. दरम्यान, यातील संशयितांना अटक करण्यात आलेली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़