सराफ बाजारातील अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:52 AM2018-10-23T00:52:42+5:302018-10-23T00:53:16+5:30
शहर स्मार्ट करतानाचा गावठाणांचा पुनर्विकास करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या महापालिकेकडून अशाप्रकारच्या स्वप्नवत योजना केव्हा राबविल्या जातील हे सांगता येणार नाही, मात्र आहे त्याच समस्या सोडविल्या जात नसल्याचे दिसत होते. दीडशे दोनशे वर्षांपासून जुन्या असलेल्या सराफ बाजारातील अतिक्रमणांची समस्या सोडविली जात नसल्याने येथील व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली
नाशिक : शहर स्मार्ट करतानाचा गावठाणांचा पुनर्विकास करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या महापालिकेकडून अशाप्रकारच्या स्वप्नवत योजना केव्हा राबविल्या जातील हे सांगता येणार नाही, मात्र आहे त्याच समस्या सोडविल्या जात नसल्याचे दिसत होते. दीडशे दोनशे वर्षांपासून जुन्या असलेल्या सराफ बाजारातील अतिक्रमणांची समस्या सोडविली जात नसल्याने येथील व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली असून, त्यामुळे आता सराफ व्यावसायिक रस्त्यावर उतरण्याची भाषा करू लागले आहेत. हॉकर्स झोन, वाहतुकीचा बृहत आराखडा अशाप्रकारच्या अनेक नियोजन करणाºया महापालिकेला मात्र अंमलबजावणीच करता येत नसल्याने आता सराफ व्यावसायिक आणि परिसरातील नागरिकांचा रोष वाढला आहे. भूतपूर्व नगरपालिका काळापासून सराफ बाजार असून, सराफ असोसिएशन ही संस्थाही तितकीच जुनी आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या बाजारालगतच भांडीबाजार, कापड बाजारदेखील आहे. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून फूलबाजार भरत असून, जंगम व्यावसायिकदेखील आहेत. फूलबाजारातच आता भाजीविक्रेत्यांनी शिरकाव केला आहे, तर नजीकच्या बोहरपट्टीत बोहरीवाणांच्या दुकानांबरोबरच मसाला विक्रेत्यांचीदेखील दुकाने आहेत. शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या आणि तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातील अरुंद गल्लीबोळांची अवस्था बघता महापालिकेने यापूर्वीच सुयोग्य नियोजन करण्याची गरज यापूर्वीच होती. परंतु अद्यापही त्यावर थेट ठोस उपाययोजना केल्या गेल्या आहेत. आज जेव्हा हा विषय ऐरणीवर आला आहे तेव्हा कागदोपत्री असलेल्या आणि अव्यवहार्य योजना कशा अमलात येतील? हा प्रश्न आहे.
आज सराफ बाजारात कोणत्याही कामासाठी शिरणे मुश्कील झाले आहे. कोणतेही नियोजन नाही, रस्त्यावरील दुकानांची अतिक्रमणे त्यात रिक्षा आणि मालवाहतूक करणाºया छोट्या मोटारी येथे शिरतात. भरीस भर जुुन्या नाशिकमध्ये राहत असल्याने मूळ नाशिककर असल्याचा हक्क सांगत मारुती कारपासून एक्सयूव्ही यासारख्या गाड्या या गर्दीत घुसवण्याचे प्रकार यामुळे अलीकडे मध्य नाशिकमध्ये जाणे हे दिव्यच आहे. कोणाला जावे लागलेच तर रविवार कारंजा, गोरेराम लेन, मातोश्री मंगल कार्यालय अशा अथवा मेनरोड, शुक्ल गल्ली येथे दुचाकी उभ्या करून नागरिक सराफ बाजारात येतात. आपल्या दुचाकींमुळे अन्य विक्रेत्यांना कोणता त्रास होईल काय हे विचारण्याची तसदीही ते घेत नाहीत. परिणामी आता ऐन सणासुदीत सराफ बाजार पेठ ठप्प होण्याची वेळ आल्याने संबंधितांवर आंदोलनाची वेळ आली आहे.
फुलबाजाराचा तिढा
महापालिकेच्या वतीने फुलबाजार जुना असला तरी तो स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने मध्यंतरी पुढाकार घेतला होता. मनसेचे अॅड. यतिन वाघ महापौर असताना यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली होती. गणेशवाडी येथे महापालिकेने भाजीमंडई बांधली असून, ती अद्याप सुरू झालेली नाही. गंगाघाटावरील भाजीविक्रेते तेथे जाण्यास तयार नसल्याने फूलबाजारातील विक्रेत्यांना तेथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव होता. मात्र सराफबाजाराप्रमाणेच फूलबाजारदेखील जुना आहे. शिवाय तो पहाटेच्या वेळीच असतो, असा दावा करीत फूलविक्रेत्यांच्या संघटनांनी त्यास कडाडून विरोध केला. गणेशवाडी येथील भाजीमंडईत सुविधा द्या, मग स्थलांतरित होऊ, असा पवित्रा घेणाºया विक्रेत्यांनी मात्र नकार दिला. त्यामुळे सराफबाजाराचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.