महापालिकेने लादलेल्या करवाढीचा विषय थेट विधानसभेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:24 AM2018-07-03T01:24:58+5:302018-07-03T01:25:05+5:30
महापालिकेने लादलेल्या करवाढीच्या मुद्द्याने पुन्हा एकदा उचल घेतली असून, शहरातील दोन आमदारांनी यासंदर्भात विधिमंडळात तारांकित प्रश्न मांडला असून, अर्धा तास चर्चा करण्यासाठी वेळ मागितल्याचे वृत्त आहे.
नाशिक : महापालिकेने लादलेल्या करवाढीच्या मुद्द्याने पुन्हा एकदा उचल घेतली असून, शहरातील दोन आमदारांनी यासंदर्भात विधिमंडळात तारांकित प्रश्न मांडला असून, अर्धा तास चर्चा करण्यासाठी वेळ मागितल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात पुन्हा एकदा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी सोपवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ते बैठक बोलविणार आहेत. याशिवाय महासभेत करवाढीचा मुद्दा उपस्थित होणार आहे. आचारसंहितेत स्थगित झालेली महासभा पुन्हा घेण्याची मागणी विरोधकांनी केली असून, त्यामुळे या महिन्यात करवाढीचा मुद्दा गाजणार आहे. महापालिकेच्या महासभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुचवलेली करवाढ सत्तारूढ भाजपाने मान्य करून घरगुतीसाठी ३२ टक्के तर बिगर घरगुतीसाठी ६२ तर औद्योगिक क्षेत्रासाठी ८४ टक्के करण्याचे ठरविले होते. मात्र हा विषय अंगलट आल्यानंतर महासभेचा ठराव करताना सरसकट १८ टक्के दरवाढ केली होती. त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्च महिन्याच्या अखेरीस वार्षिक भाडेमूल्य वाढविलेच शिवाय मोकळ्या जागांवरदेखील करआकारणी लागू केल्याने शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
शेतीवर कर नसल्याचा निर्वाळा आयुक्तांनी दिला असला तरी आता नव्या डीपीनुसार शेती क्षेत्र पिवळ्या पट्ट्यात येत असल्याने आंदोलने झाली. त्यामुळे करवाढीच्या संदर्भात विशेष महासभा घेण्यात आली. विधान परिषद निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असताना महासभेने करवाढ (वार्षिक भाडे मूल्य तसेच खुल्या जागांवरील करआकारणी) स्थगित करून त्यासंदर्भातील निर्णय आचारसंहितेनंतर घेण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता स्थानिक स्वराज संस्था पाठोपाठ शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्याने आता करवाढ या विषयाने पुन्हा उचल खाल्ली आहे.
करवाढीस विरोध करण्यासाठी शहरातील दोन आमदारांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यासाठी पत्रे दिली आहेत. या विषयावर अर्धा तास चर्चा करण्याची मागणी दोन्ही भाजपा आमदारांनी केली आहे. तर सोमवारी (दि.२) नाशिक दौºयावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विषयाबाबत गाºहाणी मांडण्यात आल्याचे वृत्त असून, त्या अनुषंगाने त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यास सांगितले असल्याचे सांगण्यात आले. महाजन यांना यापूर्वीदेखील आयुक्तांनी महासभेच्या अगोदरच हा विषय मार्गी काढण्यासाठी बैठक घेण्यास सांगितले होते.