जनावरांची गोठे स्थलांतरित करण्यास मुहूर्त लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:24+5:302021-05-28T04:11:24+5:30
इंदिरानगर - महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांनी पाच महिन्यांपूर्वी शहरातील जनावरांची गोठे शहराबाहेर स्थलांतरित करण्याचे आदेश दिले ...
इंदिरानगर - महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांनी पाच महिन्यांपूर्वी शहरातील जनावरांची गोठे शहराबाहेर स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते ; परंतु वडाळा गावातील जनावरांचे गोठे अद्यापही स्थलांतरित झाले नाही, प्रशासन देखील केवळ कागदी घोडे नाचवत आहे. त्यामुळे प्रशासन सभापतींचे आदेश जुमानत नाही काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील सर्वात जास्त गोठे वडाळा गाव परिसरात आहेत, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एक वर्षापूर्वी डिसेंबर महिन्यात जनावरांचे गोठे स्थलांतर करण्याचा आदेश देण्यात आला होता ; परंतु तेव्हाही नोटीस वाटप करण्याचा सोपस्कार करण्यात आले हाेते. मात्र, जनावरांचे गोठे हलविण्यास तेव्हाही मुहूर्त लागला नव्हता. पाच महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या सभेत सभापती गणेश गिते यांनी जनावरांचे गोठे शहराबाहेर स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे वडाळा गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. पाच महिने होऊन सुद्धा जनावरांचे गोठे हलविण्यास अद्याप मुहूर्त लागला नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वडाळा गाव रस्ता व वडाळा गावातील लोकवस्तीत जनावरांची गोठे काही स्थलांतरित करण्यात आले नाहीत त्यामुळे महापालिका प्रशासनाला माणसांपेक्षा जनावरे महत्त्वाचे असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. महापालिकेच्या वतीने गोठे धारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार केला जातो.
इन्फो..
गावाच्या रस्त्यालगतच जनावरांचा गोठा असल्याने गोठ्यातील मलमूत्र सर्रास रस्त्यालगत नाल्यात सोडण्यात आले आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी एक ते दोन जनावरांचे गोठे होते. आता त्यांची संख्या ५० ते ६० च्या घरात गेली आहेत. प्रत्येक जनावराच्या गोठ्यामध्ये सुमारे चारशे ते पाचशे जनावरे आहेत. त्या जनावरांच्या मलमूत्राचा प्रश्न निर्माण होत असल्याने बहुतेक गोठे धारकांना सर्रास जनावर मलमूत्र गोठ्याबाहेर खड्डा करून किंवा बाहेर सोडून दिले आहे, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.