नाशिक : सामाजिक जीवनात काम करताना सहजासहजी लोकमान्यता मिळत नाही, अशा परिस्थितीत कामाचा ध्यास आणि अविरत सेवा केल्यानंतरच खरी ओळख मिळते. बाळासाहेब गामणे यांनी गेली ५० वर्षे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सेवेमुळे त्यांनी आपले स्थान निर्माण केल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले. नागरी सत्कार समितीच्या वतीने बाळासाहेब गामणे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी लहाने बोेलत होते. श्रद्धा लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी प.पू. महामंडलेश्वर श्रीश्री शांतिगिरी महाराज, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जयवंत जाधव, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, सुधीर तांबे, राजाभाऊ वाजे आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाळासाहेब गामणे, मीरा गामणे यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तात्याराव लहाने म्हणाले, ३५ वर्षेे मी डोळंवर निष्ठा ठेवून काम केल्यानंतर डॉक्टर म्हणून मला ओळख मिळाली. त्याप्रमाणे बाळासाहेब गामणे यांनी वयाच्या ५० वर्षांपर्यंत समाजासाठी केलेले काम आणि दिलेले योगदान यामुळे त्यांना लोकमित्र म्हणून ओळख मिळाली. राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळेच या क्षेत्रातील मान्यवर येथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. आधुनिक काळात सच्चा माणूस मिळणे कठीण आहे. अशा स्थितीत बाळासाहेब गामणे यांच्यासारख्या सच्चा माणसाचा हा सत्कार नवीन पिढीसाठी आदर्श असल्याचे तात्याराव म्हणाले. याप्रसंगी सरपंच पोपटराव पवार, जि.प. अध्यक्ष शीतल सांगळे, शाहू खैरे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, प्रकाश आंधळे यांनी विचार मांडले प्रास्ताविक शिवाजी मानकर यांनी केले. व्ही.एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी आभार मानले. यावेळी सत्कार समितीचे अध्यक्ष राधाकिसन चांडक, डॉ. डी.एल. कराड, आदिवासी आयुक्त अर्जुन कुलकर्णी, व्ही.एन. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी मंत्री शोभा बच्छाव, पंढरीनाथ थोरे, माधवराव पाटील, नितीन भोसले, पुंजाभाऊ सांगळे आदी उपस्थित होते. गावापासून ते मंत्रालयापर्यंत सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या व्यक्ती निवडून आल्यास प्रत्येक गाव स्वावलंबी होईल. राजकारण फक्त निवडणुकांपर्यंत मर्यादित असावे. प्रत्येक शहरामध्ये ६० टक्के झोपडपट्ट्या वसल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण किंवा शहरी भागात पर्यावरण, पाणी, स्वच्छता आणि व्यसनमुक्ती यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. या स्वरूपाचे कार्य गामणे यांनी उभे केले आहे़ - पोपटराव पवार, सरपंच, हिवरगाव
हल्ली सच्चा माणूस मिळणे कठीण : तात्याराव लहाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 1:28 AM