जागर दिंडी : आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची आर्त हाक
By admin | Published: January 11, 2015 12:58 AM2015-01-11T00:58:36+5:302015-01-11T00:58:49+5:30
मायबापहो तुम्ही चूक करू नका
पंचवटी : वडिलांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते, त्यातच बळीराजाने पाठ फिरविली, घेतलेले कर्ज फेडता आले नाही म्हणून आमच्या वडिलांनी आत्महत्त्या केली. आम्ही पोरके झालो तुम्ही नाराज होऊ नका, आत्महत्त्या करणे पर्याय नाही मायबापहो आमच्या वडिलांनी जी चूक केली ती तुम्ही करू नका, लेकराबाळांना उघड्यावर सोडू नका, असे आवाहन आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी केले.
आधारतीर्थ आधाराश्रम, त्र्यंबकेश्वर व सोशल नेटवर्किंग फोरम यांच्या वतीने सकाळी दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून सकाळी बळीराजासाठी प्रबोधन दिंडी काढण्यात आली. या जागरदिंडीचे उद््घाटन भिवंडी मनपा आयुक्त जीवन सोनवणे, विजया सोनवणे, प्रमोद गायकवाड, त्र्यंबक गायकवाड यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून करण्यात आले. प्रारंभी मुलांनी बाजार समितीतून फेरी काढून शेतकऱ्यांना पत्रके वाटप केले. त्यानंतर बाजार समितीबाहेर गीत सादर करून पथनाट्य केले.
जागरदिंडीत शेकडो आत्महत्त्याग्रस्तांची मुले टाळ-मृदुंगासह सहभागी झाले होते. आत्महत्त्या केल्यानंतर स्वत:ची कुटुंबाची काय परिस्थिती होते याची व्यथा यावेळी चिमुकल्यांनी मांडून निरागस न होता धीर धरावा, चुका करू नका, असे आवाहन करून उपस्थितांचे लक्ष वेधले. बाजार समितीतून जागर दिंडी पुढे दिंडोरीनाका, जुना आडगाव नाका, नवीन आडगाव नाका, ओझररोडने निफाड, विंचूर व मराठवाड्याकडे रवाना झाली. जागरदिंडीच्या माध्यमातून मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन पत्रके वाटप करणार आहेत.
प्रबोधन दिंडीत डॉ. उत्तम फरताळे, किशोर सांळुके, संजय गायकवाड, किरण आगाज, दीपक थोरे, भरत पाटील, सचिन हांडगे, सौरभ खेडेकर, प्रदीप देशमुख आदिंसह दिंडीसाठी मदत करणारे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)