घरकूल प्रकरणाचे कामकाजजिल्हा सरकारी वकिलांकडेतात्कालिक नियुक्ती: नवा वकील नेमेपर्यंत जबाबदारीधुळे : जळगाव घरकूल प्रकरणाच्या न्यायालयीन कामकाजाची जबाबदारी जिल्हा सरकारी वकिल ॲड. शामकांत रावजी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याबाबत विधी व न्याय विभागाचा आदेश येथील जिल्हा सरकारी वकिलांच्या कार्यालयाला शनिवारी दुपारी प्राप्त झाला. यासंबंधी अहवाल जिल्हा सरकारी वकिलांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग दोन न्या. प्रदीप काळे यांच्याकडे सादर केला. शासन अधिसूचनेनुसार ९ मेपासून घरकूल प्रकरणाचे विशेष सरकारी वकील ॲड. निर्मलकुमार सुर्यवंशी व त्यांचे सहाय्यक ॲड. प्रविण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. या प्रकरणात नव्याने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अथवा पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा सरकारी वकिलांकडे न्यायालयीन कामकाज सोपविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. घरकुल प्रकरणात शासनाची परवानगी घेण्यासंदर्भात संशयित आमदार सुरेशदादा जैन यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात न्या. ठिपसे यांनी ॲड. सूर्यवंशी यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. न्यायालयीन अवमानाबाबत कारणेदाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय न्या. ठिपसे यांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर जैन यांच्या वकिलांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे ॲड. सूर्यवंशी, ॲड. चव्हाण यांच्या सरकारी वकिलपदी नियुक्तीबाबत फेरविचार करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ॲड. सूर्यवंशी, ॲड. चव्हाण यांची नियुक्ती ९ मेपासून रद्द केल्याचा आदेश येथे प्राप्त झाले. त्याबाबत निर्माण झालेला गुंता व चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.(प्रतिनिधी)
जळगाव घरकूल प्रकरण
By admin | Published: May 17, 2014 11:52 PM