कॉपी प्रकरणात जळगावची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 11:25 PM2020-03-01T23:25:42+5:302020-03-01T23:27:26+5:30
नाशिक : बारावी परीक्षेच्या पूर्वार्धातच विभागातील जळगाव जिल्ह्याने कॉपी प्रकरणांमध्ये आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये पहिल्या पेपरपासूनच गंभीर स्वरूपाची कॉपी प्रकरणे समोर आली आहे. सहा दिवसांत जळगावमधून सर्वाधिक ३० कॉपीची प्रकरणे समोर आली आहे. नाशिक जिल्हा कॉपी प्रकरणांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, तर धुळे जिल्ह्यात मात्र अद्याप एकही कॉपीचे प्रकरण समोर आलेले नसून धुळ्याची कॉपीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

यावर्षी जळगावातील भडगाव येथील परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी उत्तरपत्रिका तयार करून छायांकित प्रती तयार करण्यासारखा गंभीर प्रकार समोर आला. त्यानंतर ३० कॉपीप्रकरणे समोर आली आहेत. विभागात जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणेच सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर येत असल्याने येथील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे. परीक्षेस १८ फेब्रुवारीला प्रारंभ झाला. या पेपरला विभागातून १९ कॉपी प्रकरणे समोर आली, तर २० फेब्रुवारीला १२ कॉपी, २२ फेब्रुवारीला हिंदी भाषेच्या पेपरला ५ कॉपी, भौतिकशास्त्र व चिटणीसांची कार्यपद्धती आणि राज्यशास्त्र विषयांमध्ये १५ कॉपी, रसायनशास्त्र व वाणिज्य संघटन व व्यवस्थापनमध्ये २७ आणि २८ फेब्रुवारीला गणित आणि संख्याशास्त्राच्या पेपरला तीन कॉपीची प्रकरणे समोर आली. यात इतिहासाच्या पेपरला सर्वाधिक २१, तर इंग्रजीला १९ कॉपी प्रकरणे झाल्याचे समोर आले आहे, तर २९ फेब्रुवारीला झालेल्या सहकारशास्त्र को-आॅपरेशन व भूशास्त्राच्या पेपरला कोणताही गैरप्रकार घडला नाही.शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान सुरू केले असून, त्यासाठी विभाग व जिल्हास्तरावर भरारी पथके निर्माण केली आहे. असे असताना जळगावमध्ये ३०, नाशिकमध्ये २७, नंदुरबारमध्ये २३ कॉपीची प्रकरणे समोर आली आहे. धुळे जिल्ह्यात मात्र अद्याप एकही कॉपीचे प्रकरण समोर आलेले नसल्याने धुळ्याची कॉपीमुक्त परीक्षेच्या दृष्टीने यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे यानिमित्त समोर आले आहे.