नाशिक : शालिमार येथील नेहरू उद्यानाजवळ दोघा संशयितांनी अचानकपणे शनिवारी (दि.१) पोलिसांच्या गस्त पथकाला पाहून पळ काढण्यास सुरुवात के ली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कर्णबधिर सराईत गुन्हेगार दगडुबा मुकुंदा बोर्डे याच्या मुसक्या आवळल्या. त्याचा दुसरा साथीदार फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दोघे संशयित युवक हातात काहीतरी साहित्य घेऊन नेहरू उद्यानाच्या परिसरात एकत्र उभे होते. यादरम्यान भद्रकाली पोलिसांचे गुन्हे शोध पथकाचे गस्त पथक उपनिरीक्षक विशाल मुळे, हवालदार सोमनाथ सातपुते, उत्तम पाटील, संतोष उशीर, साहिल सय्यद यांचे वाहन पाहून संशयित दोघांनी पळ काढला. दरम्यान, पोलिसांनीदेखील त्याचां पाठलाग करण्यास सुरुवात केली.एक संशयित बोर्डे हा पोलिसांच्या हाती लागला, तर त्याचा दुसरा साथीदार पळून जाण्यास यशस्वी ठरला. बोर्डे याची झडती घेतली असता त्याच्याकडून लोखंडी दोन कटावण्या, किल्ल्यांचा जुडगा, एका चादरीमध्ये बांधलेला दहा हजार रुपये किमतीचा एलइडी टीव्ही पोलिसांनी जप्त केला. बोर्डे व त्याचा फरार झालेला साथीदार परिसरात जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने कट रचण्याकरिता एकत्र आले होते, असे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे़गुन्हेगाराला पोलीस कोठडीबोर्डे हा भोकरदन येथील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर भोकरदन पोलीस ठाण्यात ४ घरफोडी, १ चोरीचा तर जाफराबाद, पद्मापूर, हसनाबाद या पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ असे तीन घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती जालना पोलिसांनी दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी सांगितले. बोर्डे यास ऐकू येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने हाताच्या इशाऱ्याने पोलिसांना सांगितले. त्यावेळी त्याने स्वत:चा नाव, पत्ता कागदावर पोलिसांना लिहून दिला. भद्रकाली पोलिसांनी बोर्डे याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. त्यास न्यायालयापुढे हजर के ले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
जालन्याचा सराईत कर्णबधिर गुन्हेगार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:23 AM