नोकरीच्या शोधासाठी आला अन् जीव गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:21 AM2018-07-03T01:21:47+5:302018-07-03T01:22:28+5:30
अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामास असलेल्या चुलतभावाला होत असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करणाऱ्या भावावर तिघा संशयितांनी धारदार हत्याराने वार केल्याची घटना रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास प्रिसिजन आॅटो कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर घडली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारादरम्यान सोमवारी (दि़२) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला़ दिनेश हिरामण जाधव-माळी (रा़ दोंदवाड, पो़ विंचूर, ता़ जि़ धुळे) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, याप्रकरणी अंबड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तिघा संशयितांना अटक केली आहे़
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामास असलेल्या चुलतभावाला होत असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करणाऱ्या भावावर तिघा संशयितांनी धारदार हत्याराने वार केल्याची घटना रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास प्रिसिजन आॅटो कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर घडली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारादरम्यान सोमवारी (दि़२) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला़ दिनेश हिरामण जाधव-माळी (रा़ दोंदवाड, पो़ विंचूर, ता़ जि़ धुळे) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, याप्रकरणी अंबड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तिघा संशयितांना अटक केली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मूळचा धुळे जिल्ह्यातील रहिवासी योगेश अशोक माळी (२४, रा. भाग्यश्री मेडिकलच्या बाजूला, कारगिल चौक, दत्तनगर, सिडको) हा अंबड औद्योगिक वसाहतीतील बोरोसिल क्लासपॅक कंपनीमध्ये कामास आहे़ संशयित किरण ऊर्फ सोपान वाघ (२२, रा. विल्होळी) हा योगेश माळी याचा कंपनीतील सहकारी असून, या दोघांमध्ये योगेश हा उच्चशिक्षित तर वाघ हा कमी शिकलेला असूनही एकच काम करीत असल्याने त्यांच्यात वाद होते़ कंपनीमध्ये रविवारी (दि़१) दुपारी सव्वा तीन वाजेच्या चहाच्या सुट्टीत संशयित किरण वाघ याने पुन्हा मस्करी केल्याने योगेश माळी याने ताकीदही दिली होती़ त्यावेळी संशयित किरण वाघ याने, तुझ्याकडे पाहतो अशी धमकी दिली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कंपनीतून सुटी झाल्यानंतर योगेश माळी हा प्रिसिजन आॅटो कंपनीतील भूषण भदाणे, समाधान देवरे या मित्रांना तसेच नोकरीच्या चौकशीसाठी धुळ्याहून नाशिकला आलेला चुलतभाऊ दिनेश जाधव यांना भेटण्यासाठी जात होता़ संशयित किरण वाघ व त्याचे दोन सहकारी राकेश लक्ष्मण वाघ (२३) व हिरामण पोपट थोरात (२६, तिघेही राहणार विल्होळी) यांनी योगेशला अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली़ त्यामुळे योगेशने प्रिसिजन कंपनीमध्ये धाव घेऊन मित्रांना तसेच भावास घडलेल्या घटनेची माहिती दिली़ यानंतर दिनेश जाधव व त्याचे मित्र हे मध्यस्थीसाठी कंपनीबाहेर गेले असता दिनेश व संशयितांमध्ये वाद झाले़ यावेळी तिघा संशयितांपैकी दोघांनी दिनेशला पकडून ठेवले तर वाघ याने आपल्या हातातील धारदार हत्याराने दिनेशवर वार केले़
कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर संशयित फरार झाले़ तर गंभीर जखमी झालेल्या दिनेश जाधव यास उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते़ तसेच घटनेची माहिती मिळताच उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त मोहन ठाकूर, अंबडचे पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, उपनिरीक्षक महेश म्हात्रे हे घटनास्थळी दाखल झाले होते़ दरम्यान, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या दिनेशचा सोमवारी (दि़२) सकाळी मृत्यू झाला़ याप्रकरणी अंबड पोलिसांनी तिघा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़
भावासाठी घेतली धाव
नाशिकला चुलतभाऊ कंपनीत कामास असल्याने त्याच्या ओळखीने अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये नोकरी शोधण्यासाठी दिनेश जाधव हा धुळ्याचा युवक नाशिकला आला होता़ आपल्या चुलतभावास मारहाण होत असल्याने त्याने मध्यस्थी केल्याने संशयितांनी धारदार शस्त्राने वार केले़ केवळ मध्यस्थीसाठी गेलेल्या दिनेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील स्थानिक व परजिल्ह्यातील कामगार यांच्यातील संघर्ष समोर आला आहे.