नाशिक : के. के. वाघ तंत्रनिकेतन नाशिकच्या मेकॅनिकल विभागातील १५ विदयार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळाली आहे. कोरोनाच्या या भयावह परिस्थितीत अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या असताना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध झाल्याने उद्योग क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्मितीचे संकेत मिळू लागले आहेत.
--
जुन्या पेन्शन योजनेसाठी मागविली शिक्षकांची माहिती
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या पे युनिटने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळा किंवा तुकडीवार नियुक्त व त्यानंतर १०० टक्के अनुदान मिळालेल्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून माहिती मागविली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनावर पडणाऱ्या वित्तीय भाराची माहिती सादर करण्यासाठी कर्मचारीनिहाय माहिती भरणे आवश्यक असल्याने पे युनिटने ही माहिती मागविली आहे.
मुख्याध्यापक संघाचे २८ जूनपासून आमरण उपोषण
नाशिक : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुख्याध्यापक संघातर्फे २८ जूनपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव भामरे, कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, आर. डी. निकम, नीलेश ठाकूर, जयेश सावंत आदींनी दिली आहे. शिक्षकांच्या समस्या व मागण्यांसंदर्भात शिक्षण उपसंचालक, वेतन पथक कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर विविध आंदोलने करूनही शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाने केला आहे.
---
शिक्षकांसाठी विनामूल्य ऑनलाइन कार्यशाळा
नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाटणारी चिंता आणि हातातील शक्य बाबी ओळखून उपाययोजनांचा शोध घेण्याविषयी शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी हार्ट फुलनेस संस्थेतर्फे ७ जूनपासून सलग सहा दिवस सायंकाळी ५ ते ६ या वेळेत विनामूल्य ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.