नाशिक : महापालिका निवडणुकीमुळे आता राजकीय ताबूत तापले असून, जुन्या नाशकातील मुलतानपुरा रुग्णालयाचे उद्घाटन तसेच अन्य विकासकामांच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादीतच वाद पेटला आहे. मुलतानपुरा रुग्णालयासाठी आपण पाठपुरावा केला असा दावा समिना मेमन यांनी केला असून, आपल्याला अंधारात ठेवून सुफी जीन यांनी उद्घाटन सोहळा पार पाडला, अशी त्यांची तक्रार आहे तर दुसरीकडे सुफी जीन यांनी मात्र आरोप खोडून काढले आहे.
नाशिक शहरातील मुलतानपुरा रुग्णालयाची इमारत सज्ज असून, त्याठिकाणी प्रत्यक्ष उपचार सुरू करण्याचा विषय गेल्या वर्षभरापासून गाजत आहे. रुग्णालयात कधी फर्निचर बसवणे तर कधी विद्युत जनित्रे बसविण्याचे काम कार्यवाहीत असल्याचे सांगितले जात होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे मुळातच महापालिकेकडे वैद्यकीय कर्मचारीवर्ग अपुरा असल्याने रुग्णालय सुरू करता येत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे होेते. परंतु स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सय्यदानी माँजी साहेब प्रसूतिगृह, मौलानाबाबा व्यायमाशाळा यांचे उद्घाटन व मौलानाबाबा व्यायामशाळा ते दूध बाजार रस्ता व काझीपुरा चौकी ते आझाद चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण भूमिपूजन असे कार्यक्रम पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले.
या उद्घाटन सोहळ्यावरून समिना मेमन आणि सुफी जीन यांच्यात जुंपली आहे. मुलतानपुरा रुग्णालय पूर्ण करण्यासाठी आणि ते सुरू करण्यासाठी आपण पाठपुरावा केला. सध्या तेथील वीजपुरवठा खंडित असून, ते सुरू करण्यावरून आपण पाठपुरावा करीत आहोत, मात्र असे असताना परस्पर उद्घाटन सोहळा करण्यात आला आहे. येथील होर्डिंग्जवरही आपले नाव नव्हते, अशी त्यांची तक्रार आहे. मात्र, सुफी जीन यांनी सर्व मुद्दे खोडून काढले असून, आपण केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे उपलब्ध आहेत. या रुग्णालयासाठी कर्मचारी वर्ग आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून मंजूर करून घेतला असून, हे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात जिजामाता रुग्णालयात काम करीत आहेत, असे सुफी जीन यांनी सांगितले.
कोट...
मुलतानपुरा रुग्णालयासाठी मी पाठपुरावा केला. तेथील मीटरचा प्रश्न सुटल्यानंतर तो लगेचच सुरू होईल. रस्त्याच्या कामांना स्थायी समितीत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हे कामही गैर नाही. कामे बेकायदा असती तर पालकमंत्री आणि आयुक्त कसे काय उपस्थित झाले असते?
- सुफी जीन, नगरसेवक
कोट..
प्रभागातील रस्ते कामांसाठी अद्याप निविदाही मागवलेल्या नाही तोच कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुलतानपुरा रुग्णालयासाठी मी पाठपुरावा केला होता. मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम परस्पर करण्यात आला.
- समिना मेनन, नगरसेवक