नाशिक : वसंतरावांनी मराठी रंगभूमीला खूप मोठे योगदान दिले. १९५७ पासून वैविध्यपूर्ण ४२ नाटके त्यांनी लिहिली. शब्दप्रभू असलेल्या कानेटकर सरांचा सहवास प्रत्येकाचा क्षण न क्षण सुगंधी करून जाणारा असायचा, असे प्रतिपादन माजी आमदार आणि साहित्यिक हेमंत टकले यांनी केले.
सावानाच्या व्याख्यानमालेत वसंत कानेटकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांच्या स्मृतीनिमित्त वसंतराव कानेटकरांच्या नाटकांचे अंतरंग या विषयावरील पुष्प गुंफताना टकले बोलत होते. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमात लावलेले नाटक शिकवायला स्वत: कानेटकर सर म्हणजे अत्यंत आनंदाचे क्षण होते. एकूण मराठी रंगभूमीला आणि नाटकांना अनोखी उंची मिळवून दिली. ज्ञानपीठ विजेत्या वि. स. खांडेकर यांनीदेखील कानेटकर सरांच्या नाटकांचे कौतुक केले, त्यातच त्यांचे श्रेष्ठत्व अधोरेखित हाेते, असेही टकले यांनी नमूद केले. यावेळी अंजलीताई, अंशुमन आणि दिगंबर या कानेटकर कुटुंबीयांनी त्यांच्या अनुभवांचे कथन केले. स्वागत आणि प्रास्ताविक जयप्रकाश जातेगावकर यांनी, तर वक्त्यांचा परिचय देवदत्त जोशी यांनी करून दिला. आभार डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी मानले.
फोटो ०५हेमंत टकले