देवळा : दरवर्षी पर्यावरण दिनाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने हजारो वृक्षांची लागवड करून पर्यावरणाविषयीची तळमळ व प्रेम व्यक्त करण्यात येते; परंतु नंतर लागवड केलेल्या वृक्षांचे खरेच संगोपन केले जाते का, हा संशोधनाचा विषय आहे; परंतु कनकापूर येथील शेतकरी चार वर्षांपासून स्वतः लागवड केलेल्या वृक्षांचा दरवर्षी वाढदिवस साजरा करून ह्यवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेह्ण या काव्यपंक्तींची प्रचिती आणून देत आहेत.कनकापूर येथील शेतकरी बापू शिंदे हे दरवर्षी आपल्या शेताच्या बांधावर आंबा, सीताफळ, आवळा, वड, पिंपळ आदी देशी वृक्षांची लागवड करतात. लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन व संरक्षण काटेकोरपणे केल्यामुळे सर्व झाडे जगली आहेत. त्या झाडांचा दरवर्षी ते वाढदिवस साजरा करतात, शिंदे यांची पत्नी प्राजक्ता, मुले इश्वर व साक्षी असे कुटुंब मिळून त्या झाडांची पूजा करून त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच नवीन झाडांची लागवड करतात. चार वर्षांपासून हा उपक्रम शिंदे आपल्या शेतात राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत.शेतातील सामायिक बांध व हद्दीच्या वादांमुळे बांधावरील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली आहे. ग्रामीण भागात शेतातील बांधावर असलेली झाडे मोठ्या प्रमाणात नामशेष झाल्यामुळे काही शेतात सावलीसाठीदेखील झाड शिल्लक राहिलेले नसून, अशी शेते ओकीबोकी दिसू लागली आहेत. झाडांच्या आसऱ्याला येणारे विविध पक्षी, मधमाश्यांसारखे कीटक हे घटक महत्त्वाचे व शेतीसाठी पूरक आहेत. शेतीसाठी पर्यावरणाच्या साखळीतील असे महत्त्वाचे घटक नामशेष झाल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, पूर्वीच्या तुलनेत शेतातील पिकांवर विविध प्रकारच्या रोगराई व किडींना पिके बळी पडत आहेत.शेताच्या बांधावरील झाडांचे पर्यावरणाच्या साखळीतील महत्त्व व शेती उत्पादनात होणारा फायदा, तसेच झाडांमुळे शेतात निर्माण होणारे आल्हाददायक वातावरण आदी गोष्टींचे महत्त्व लक्षात आले. सेंद्रिय शेतीला आता महत्त्व प्राप्त होत असून, बांधावरील झाडांची त्यात महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. शेतीचे आरोग्य हे बांधावर असलेल्या झाडांवर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने दरवर्षी बांधावर किमान पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करून पर्यावरणाला हातभार लावावा.- बापू शिंदे , शेतकरी, कनकापूर
कनकापूरच्या शेतकऱ्याचे जडले वृक्षवल्लीशी नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 11:36 PM
देवळा : दरवर्षी पर्यावरण दिनाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने हजारो वृक्षांची लागवड करून पर्यावरणाविषयीची तळमळ व प्रेम व्यक्त करण्यात येते; ...
ठळक मुद्देचार वर्षांपासून शेतात साजरा होताहेत वृक्षांचे वाढदिवस