नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन येत्या ५ आणि ६ आॅक्टोबरला करण्यात येणार असून, या मेळाव्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक आणि अभिनेते दीपक करंजीकर यांची निवड करण्यात आली आहे, तर मेळाव्यात होणाऱ्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कादवा शिवार प्रतिष्ठानचे कवी आणि लेखक विजयकुमार मिठे राहणार आहेत.सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या आयोजनाची माहिती देण्यात आली. या मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई दूरदर्शनचे अधिकारी जयू भाटकर आणि नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे तसेच साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, सहायक सचिव अभिजीत बगदे आणि सांस्कृतिक कार्यसचिव प्रा.डॉ. वेदश्री थिगळे यांनी दिली.शनिवार, दि. ५ रोजी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी सुशीलकुमार शिंदे यांची प्रकट मुलाखत सावानाचे उपाध्यक्ष कवी किशोर पाठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६.३० पासून कविसंमेलन रंगणार आहे, तर रविवारी सकाळी १० वाजता मेळाव्याचे अध्यक्ष दीपक करंजीकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल, तर दुपारी १२.३० वाजता प्रगत समाज साहित्याभिमुख होणे गरजेचे या विषयावरील परिसंवादात साहित्यिक प्रा. डॉ. दिलीप धोंडगे, प्रा. डॉ. सुनील कुटे आणि डॉ. चंद्रकांत संकलेचा यांचा सहभाग राहणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० वाजता कवी गोविंद काव्य स्पर्धा, डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धा, चंद्रकांत महामिने विनोदी कथा स्पर्धा, जयश्री राम पाठक काव्य पुरस्कार आणि लेखक गौरव सोहळा रंगणार आहे, तर ४ वाजता इस्त्रोचे माजी संचालक सुरेश नाईक आणि अपूर्वा जाखडी यांचे चांद्रयान-२ मोहिमेवर व्याख्यान होणार आहे.तसेच मेळाव्याचा समारोप हा डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचा ‘रहे ना रहे हम’हा कार्यक्रम रंगणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदप्रसंगी उपाध्यक्ष किशोर पाठक, अर्थसचिव शंकर बर्वे, नाट्यगृह सचिव देवदत्त जोशी, वस्तुसंग्रहालय सचिव उदयकुमार मुंगी, बालविभाग प्रमुख संजय करंजकर आणि ग्रंथ सचिव गिरीश नातू आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा साहित्यिक मेळावा अध्यक्षपदी करंजीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:51 AM