करमळकर यांनी स्वीकारला आरोग्य विद्यापीठाचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:15 AM2021-02-12T04:15:15+5:302021-02-12T04:15:15+5:30
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना गुरुवारी (दि. ...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना गुरुवारी (दि. ११) निरोप देण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. म्हैसेकर यांनी विद्यापीठाचा मानदंड करमळकर यांच्याकडे सुपूर्द केला.
डॉ. नितीन करमळकर सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असून, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात बी.एस्सी. केल्यानंतर त्यांनी एम.एस्सी.साठी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. पुढे ‘पेट्रोग्राफी जिओकेमिस्ट्री ऑफ अल्ट्रामफाइट्स फ्रॉम पार्टस ऑफ लडाख हिमालया (विथ रेफ्रन्स टू क्रोमॅटिक मिनरलायझेशन)’ विषयात पीएच.डी. प्राप्त केली. याच विषयाशी निगडित बाबींवर त्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनीत तसेच जर्मनीत संशोधन केले आहे. डॉ. नितीन करमळकर यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन, प्रशासन तसेच संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव असून पर्यावरण, भूगर्भशास्त्र, भूरसायनशास्त्र हे त्याचे संशोधनाचे विषय. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. परदेशातील काही संस्थांबरोबर सध्या संशोधन प्रकल्प सुरू आहेत. पाषाण हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून, विविध प्रकारच्या अधिवासात आढळणाऱ्या पाषाणांवर त्यांचे संशोधन सुरू आहे.
--इन्फो---
डॉ. म्हैसेकर व प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांच्या पदाचा कार्यकाळ गुरुवारी (दि. ११) संपुष्टात आला. त्यांना निरोप देतानाच विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज व कार्यप्रणालीबद्दल सादरीकरणाद्वारे करमळकर यांनी थोडक्यात माहिती दिली. याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी उपस्थित होते.
आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारताना आनंद होत आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आरोग्य क्षेत्राशी निगडित लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाबरोबर विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधनाचे कामकाज विद्यापीठातून यापुढे घडावे, यासाठी प्रयत्नशील राहील.
- डॉ. नितीन करमळकर, प्रभारी कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ