त्यागमूर्ती कर्मयोगीनी शांताबाई दाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 07:01 PM2020-01-01T19:01:05+5:302020-01-01T19:09:47+5:30
हातात पणती घेऊन अंधारात चाचपडणाऱ्यांना दिशा दाखविणा-या डॉ. शांताताई दाणी यांची आज जयंती. त्यांचे कार्य ज्ञानाच्या प्रकाशातून अज्ञानाचा अंधकार ...
हातात पणती घेऊन अंधारात चाचपडणाऱ्यांना दिशा दाखविणा-या डॉ. शांताताई दाणी यांची आज जयंती. त्यांचे कार्य ज्ञानाच्या प्रकाशातून अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी प्रेरणादायी आहे. थोर कर्मयोगिनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्राच्या संचालिका अशी विविध पदे भूषविणा-या डॉ. शांताताई दाणी यांची कार्याप्रती निष्ठा होतीच. परंतु त्या कृतीशील त्यागमूर्ती होत्या.
‘विद्या हे धन आहे श्रेष्ठ साया धनाहून।
तिचा साठा जयापाशी तो ज्ञानी मानती जन।।’
या सुभाषितानुसार अंधारात चाचपडणाऱ्यांना जणूकाही हातात पणती घेऊन दिशा दाखविणाºया डॉ. शांताताई दाणी यांचे कार्य ज्ञानाच्या प्रकाशातून अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी प्रेरणादायी आहे.
घरात शांती लाभली म्हणून शांता हे नाव ठेवलेल्या ताई अनेकांसाठी शीतल ‘चंदनाची छाया’ बनल्या. लहानपणापासून अत्यंत धीट, हुशार, कनवाळू, सुस्वरूप ताई म्हणजे आमच्या गळ्यातील ताईतच होत्या.
मुलींचे शिक्षण हे प्रगतीचे लक्षण आहे.
‘कळी उमलणार नाही जीवनरसावाचून।
मुली बहरणार नाही शिक्षणावाचून।।’
या ओळीतून स्त्री शिक्षणाचे महत्त्व सावित्रीबार्इंनी सांगितले होते. शिक्षणामुळेच मुलींचा व्यक्तिगत विकास होतोच पण त्याचबरोबर कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय विकासदेखील होतो, ही दूरदृष्टी तार्इंनी हेरली होती. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच आपला आदर्श मानणाºया तसेच पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्याकडून पे्ररणा घेणाºया ताईसाहेबांच्या कार्यावर बाबासाहेबांच्या व दादासाहेबांच्या विचारांचा, आचारांचा व कृतीचा ठसा दिसतो. त्याचाच प्रत्यय म्हणजे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र, नाशिक’या शैक्षणिक संस्थेची स्थापना. या संस्थेअंतर्गत रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, कुणाल प्राथमिक शाळा व तक्षशिला विद्यालय येथे ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. गौतम छात्रालय, रमाबाई वसतिगृह येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.
‘करण्यासारखे खूप असते, मात्र त्यासाठी जिद्द हवी असते’ असा कानमंत्र तार्इंनी आम्हाला दिलेला आहे. त्या नेहमी म्हणायच्या ‘शाळा म्हणजे ज्ञान देण्याचे, समाजक्रांतीचे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या क्रांतीतत्त्वाचे तसेच स्त्री शक्तीच्या विकासाचे गीत आहे.’
मुळातच अत्यंत बुद्धिमान आणि विव्दान असल्यामुळे त्यांच्यासारखी व्यक्ती एखाद्या कार्याला लाभणे हीच त्या कार्याची यशस्वीता हे समीकरण जणू ठरलेलेच होते. हा संघर्षमय प्रवास अनेकदा त्यांनी एकाकी केला. मात्र त्या कधीच डगमगल्या नाही की खचल्या नाहीत. त्यांचे संपूर्ण जीवनच एक संघर्ष यात्रा होते. सायकल हे त्यांच्या त्यागशील आणि निरलस सेवेचेच प्रतीक होते.ताई एक उत्तम वक्त्या होत्या, एक आदर्श शिक्षिका, प्रतिभावंत कवयित्री, आमदार, अनेकांना दिशा दर्शविणारी मार्गदर्शिका, सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी केलेले परदेश दौरे असे एक ना अनेक पैलू पाडलेला हा एक अनमोल हिराच होत्या.
मेणाहुनी मऊ आणि वज्राहुनी कठोर, अस्सल स्त्री शक्तीचा प्रत्यय आणून देणाºया तार्इंच्या जीवनाविषयी माहिती श्रीमती भावना भार्गवे यांनी शब्दांकन केलेल्या ‘रात्रंदिन आम्हा...’ या पुस्तकातून मिळते.
आपल्या शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे केवळ पुस्तकी शिक्षण नको, विद्यार्थी विकासासाठी पूरक असावे, अशीच त्यांची धडपड असायची. म्हणून तर शाळेत विविध उपक्रमांची जणूकाही स्पर्धाच असायची. शैक्षणिक, क्रीडाक्षेत्र, सांस्कृतिक, वैज्ञानिक अशा विषयांच्या स्पर्धा व उपक्रम नियोजनबद्धरीत्या राबविले जायचे. ताईसाहेब आज हयात नाहीत. पण रमाईच्या प्रांगणात असलेला भव्यदिव्य स्तूप आपल्या कर्तृत्वाची साक्ष देतो. अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या सदिच्छा भेटी विविध स्मृतीरूपात दिसतात. आजही विद्यालयात कोणताही कार्यक्रम असो, जसे शालांत परीक्षेचा निकाल, विविध स्पर्धा, त्यात विद्यार्थ्यांनी मिळविलेली बक्षिसे, सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वांसाठी जणूकाही आपली कृपादृष्टी आमच्यावर आहे, असे जाणवते. पाठीवर शाबासकीची थाप पडल्यासारखी वाटते. आपण लावलेल्या वृक्षाचे रूपांतर वटवृक्षात होत आहे, हे सांगताना मन भरून येते.
वेगवेगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेणा-या विद्यार्थिनी, विद्यार्थी अचानक शाळेला भेट द्यायला येतात. नतमस्तक होतात. मी या शाळेची विद्यार्थिनी असे अभिमानाने सांगतात तेव्हा खरोकर अंत:करण भरून येते, मन सद्गतीत होते आणि नकळतपणे ओठातून आपोआप शब्द बाहेर पडतात, हे सर्व वैभव पाहण्यासाठी आम्हाला पुन्हा-पुन्हा प्रेरणा देण्यासाठी खरंच ताई आज तुम्ही हव्या होत्या...
- सुमंगला संजय शिंदे,
उपशिक्षिका, तक्षशिला विद्यालय, नाशिक