वर्तन सुधारण्याची ‘खाकी’ देणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:10 AM2021-06-11T04:10:41+5:302021-06-11T04:10:41+5:30

शहर व परिसरातील गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी झोपडपट्टीदादा कायदा (एमपीडीए), मोक्कासारख्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ...

Khaki will give you a chance to improve your behavior | वर्तन सुधारण्याची ‘खाकी’ देणार संधी

वर्तन सुधारण्याची ‘खाकी’ देणार संधी

Next

शहर व परिसरातील गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी झोपडपट्टीदादा कायदा (एमपीडीए), मोक्कासारख्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. नाशिकरोड, उपनगर, गंगापूर, भद्रकाली पोलीस ठाण्यातील गुन्हेगारांच्या टोळ्यांभोवती मोक्काचा फास आवळला आहे. यामुळे खून, दरोडे, बलात्कार, दंगलीसारख्या गुन्हेगारीच्या घटना घडवून आणणाऱ्या टोळ्या हादरल्या आहेत. भूमाफियांच्याही टोळीला यामुळे दणका बसला आहे. भूमाफियांच्या टोळीचा एका भूधारक वृध्दाच्या खुनात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचे तपासातून निष्पन्न करत संघटित व नियोजनबध्द पध्दतीने खून केल्याचा ठपका ठेवून त्या टोळीवर मोक्का लावणे आणि टोळीचा फरार म्होरक्याच्या संपत्तीवर टाच आणण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई ठरली. त्याचप्रमाणे परिमंडल-१ व २मधील बहुतांश सराईत गुन्हेगारांवरही पाेलीस उपायुक्तांना पाण्डेय यांनी आदेशित करत त्यांना एक व दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे वारंवार ताब्यात घेऊन समज देऊनदेखील वर्तणुकीमध्ये सुधारणा न करणाऱ्या काही सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी कारागृहात स्थानबध्दही करण्यात आले आहे.

---इन्फो---

अनावधानाने गुन्हेगार झालेल्यांचे समुपदेशन

सराईत गुन्हेगारांचा अपवाद वगळता अनावधानाने गुन्हा घडला आणि गुन्हेगारीच्या दलदलीमध्ये ते ओढले गेले असेही काही गुन्हेगार शहर व परिसरात वावरत असतात. अपघाताने गुन्हेगारीमध्ये आलेल्या व किरकोळ स्वरुपाच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या गुन्हेगारांचा पोलिसांकडून मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात पोलीस अधिकाऱ्यांसह मानसोपचारतज्ज्ञ व सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या प्राध्यापकांकडून गुन्हेगारांचे समुपदेशनही केले जाणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.

Web Title: Khaki will give you a chance to improve your behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.