मालेगावी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:34+5:302021-01-14T04:12:34+5:30
----------------------- तहसील आवारात पार्किंगची गैरसोय मालेगाव : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात पार्किंगची सोय नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कार्यालय ...
-----------------------
तहसील आवारात पार्किंगची गैरसोय
मालेगाव : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात पार्किंगची सोय नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कार्यालय आवारात सध्या ग्रामपंचायत निवडणूक साहित्य वाटपासाठी मंडप उभारण्यात आला आहे. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अडचण होत आहे. वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.
---------------------
मालेगावी डासांचा उपद्रव
मालेगाव : शहरात डासांनी उच्छाद मांडला आहे. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात डास आढळून येतात. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दैनंदिन प्रतिबंध औषधांची फवारणी केली जात नाही. वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. महापालिकेने शहरात तातडीने प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी केली जात आहे.
--------------------
टेहरे चौफुली बनली मृत्यूचा सापळा
मालेगाव : शहरालगतची टेहरे चौफुली मृत्यूचा सापळा बनली आहे. टेहरे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डा तेच समजत नाही, अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. तसेच ३० ते ४० खेड्यांचा संपर्क रस्ता म्हणून हा रस्ता ओळखला जातो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
------------------------
स्टेट बँक चौकात वाहतूक कोंडी
मालेगाव : शहरातील स्टेट बँक चौक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. याठिकाणी स्टेट बँक शाखा आणि दोन नामांकित हॉटेल असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. मात्र, वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्यामुळे वाहनचालकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत. याठिकाणी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.
----------------------
सबस्टेशन परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
मालेगाव : सोयगाव ते सबस्टेशन दरम्यानचा रस्ता खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डा असा झाला आहे. या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती आहेत. विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालता येत नाही. वाहनधारक कसरत करीत वाहने हाकत आहेत. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेने हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
----------------
मंगल कार्यालयातील गजबज वाढली
मालेगाव : कोरोनाच्या संसर्गानंतर आता सुरक्षिततेची काळजी घेत लग्न कार्याला सुरुवात झाली आहे. मंगल कार्यालयांतील गजबज वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मंगल कार्यालयांचा व्यवसाय ठप्प झाला होता. मात्र, आता लगीन सराई सुरू झाल्याने मंगल कार्यालये, मंडप, बँड पथक, घोडेवाले यांना सुगीचे दिवस आले आहेत.