दिंडोरी : येथील श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग व कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित जागतिक कृषी महोत्सवास शुक्रवार ( दि. २२) पासून प्रारंभ झाला आहे. महोत्सवाचे उद्घाटन सेवामार्गाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते माती पूजन करून झाले. यंदाचा कृषी महोत्सव थेट शेतकऱ्यांच्या बांधावर तब्बल ११०० ठिकाणी होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून कल्पना सरोज, खासदार हेमंत गोडसे, नगराध्यक्षा रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, नगरसेवक प्रमोद देशमुख, माधवराव साळुंके, दिलीप जाधव, गुलाब जाधव, सुनील आव्हाड, सतीश देशमुख, नरेंद्र जाधव आदी उपस्थित होते. यावेळी दरवर्षीप्रमाणे वनारवाडी येथील शेतकरी जोडप्याचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी कृषी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले तर अण्णासाहेब मोरे यांनी सांगितले, शेतीतील कृषितंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एकाच वेळी ११०० ठिकाणी हा उपक्रम सुरू होत आहे. जास्त गर्दी न करता काेरोनाबाबत सरकारचे सर्व नियम पाळून याची सुरुवात केली आहे. साठी उलटलेला शेतकरी आजही शेती करतो मात्र तरुण फारसा याकडे वळत नाही. स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने कृषी मेळावा घेतला जातो. सत्संग घेतला जात नाही. गेल्या ४०-५० वर्षांपासून केंद्राच्या वतीने ग्रामाभियान सुरू करून सज्ञान व सुदृढ पिढी निर्माण करण्याचे कार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ११ लाख शेतकरी जोडणार अण्णासाहेब मोरे यांनी यावेळी स्वामी समर्थ केंद्राच्यावतीने राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मोरे म्हणाले, विवाह मंडळाकडे ४० हजार विवाहेच्छुक मुलामुलींची ऑनलाईन नोंद झालेली आहे. शेतकऱ्यांकडे स्वतःचे बियाणे नाही. त्यामुळे शाकंभरी बीज भांडार या उपक्रमातून ७०० पेक्षा जास्त देशी बियाण्यांचे संवर्धन व संकलन केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला हा कृषी महाेत्सव जगभरात पोहचला असून किमान ११ लाख शेतकरी यात जोडले जाणार असल्याचेही मोरे यांनी सांगितले.
कृषी महोत्सव थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 1:30 AM
श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग व कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित जागतिक कृषी महोत्सवास शुक्रवार ( दि. २२) पासून प्रारंभ झाला आहे. महोत्सवाचे उद्घाटन सेवामार्गाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते माती पूजन करून झाले. यंदाचा कृषी महोत्सव थेट शेतकऱ्यांच्या बांधावर तब्बल ११०० ठिकाणी होणार आहे.
ठळक मुद्देसमर्थ सेवा मार्ग : देश-परदेशासह ११०० ठिकाणी कार्यक्रम