नाशिक : एकविसाव्या शतकातही भारतातील महिलांबाबत असलेली सामाजिक विषमता आणि भीषण वास्तव यांचे चित्रण असलेला मुंबई येथील ‘कुंभिल शिवा’ या लघुपटास दादासाहेब फाळके यांच्या नावे देण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट कलातीर्थ लघुपट’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याशिवाय सर्वोत्कृष्ट छायाचित्रण व संकलन या विभागातही त्याच लघुपटाने बाजी मारली.भारतीय चित्रसाधना नाशिक आणि शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलातीर्थ लघुपट महोत्सव शंकराचार्य न्यास येथे लघुपट सादरीकरण आणि पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची नात स्वाती फाळके -काळे या उपस्थित होत्या. याशिवाय शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी, प्रमोद भार्गवे, महोत्सव संयोजक शौनक गायधनी आदी उपस्थित होते.यावेळी स्वाती फाळके-काळे म्हणाल्या की, महोत्सवात फाळके कुटुंबीयांचा घटक म्हणून माझा केलेला गौरव हा खरे तर दादासाहेबांचा गौरव आहे. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून रघुनाथ फडणीस व नीलेश घुमरे यांनी काम पाहिले. महोत्सवाचे प्रास्ताविक शौनक गायधनी यांनी तर सूत्रत्रसंचालन स्वरदा कुलकर्णी यांनी केले. ऐश्वर्या हुदलीकर यांनी आभार मानले.महोत्सवाचे हे सलग तिसरे वर्ष असून, यात नाशिकसह मुंबई, पुणे, अमरावती, कोल्हापूर, परभणी, धुळे, सावंतवाडी, संभाजीनगर, शिर्डी येथून लघुपटांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी परीक्षकांनी निवडलेल्या १० लघुपटांना अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. त्यात वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट लेखनासाठी घुसमट (कोल्हापूर), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी अपूर्णविराम (परभणी), तर सर्वोत्कृष्ट संगीत विभागात द ग्रीन शॅडो (पुणे) या लघुपटांना गौरविण्यात आले.
कलातीर्थ लघुपट महोत्सवात ‘कुंभिल शिवा’ची बाजी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:25 AM