मानोरीत नेटवर्क अभावी आॅनलाईन शिक्षण आॅफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 06:52 PM2020-10-07T18:52:22+5:302020-10-07T18:53:07+5:30
मानोरी : मानोरी बुद्रुक येथे नेटवर्कचा बोजवारा उडालेला असल्याने विद्यार्थी आॅनलाइन प्रणालीच्या शिक्षणापासून वंचित राहत आहे.
मानोरी : मानोरी बुद्रुक येथे नेटवर्कचा बोजवारा उडालेला असल्याने विद्यार्थी आॅनलाइन प्रणालीच्या शिक्षणापासून वंचित राहत आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक उमेश मूप्पीडवार यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची खबरदारी बाळगत स्वखर्चाने स्वाध्याय पुस्तीका तयार केली आहे. गावात तसेच वाड्या-वस्त्यावरील विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन मोफत वाटप करून सोशल डिस्टसिंगचे नियम पाळत पुस्तिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यानामार्गदर्शन सुद्धा करत आहे.
सर्वत्र कोरोनाची वाढती धग कायम असून शाळा, महाविद्यालये अद्यापही बंद असल्याने आॅनलाइन प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहे. आॅनलाइन शिक्षणाला ग्रामीण भागात मात्र नेटवर्क अभावी अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही कंपनीच्या सिमकार्डला पुरेसे नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहे. मानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची बदली झाल्याने शिक्षक उमेश मुप्पीडवार या एकट्या शिक्षकांवर इयत्ता पहिली ते चौथी या चार वर्गांची जबाबदारी आली आहे. शालेय कामकाज बघून विद्यार्थ्यासाठी स्वखर्चाने स्वाध्याय पुस्तिका तयार करून त्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शिक्षणाचे धडे देत असून स्वाध्याय पुस्तिका मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
कोट...
मानोरीत अनेक वर्षांपासून नेटवर्कची सुविधा नसल्याने त्यात आॅनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना हजारो रु पयांचा स्मार्ट मोबाईल घेऊन देणं शक्य होत नाही. अशातच मुप्पीडवार यांनी विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका घरोघरी देऊन अभ्यास करून घेत असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी करीत असलेली घावपळ कौतूकास पात्र आहे.
- रवींद्र पवार, पालक.
घरोघरी जाऊन स्वाध्याय पुस्तिका स्वखर्चाने वाटणे हे अवघड असून एक शिक्षक एकाच वेळी चार इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिकवत आहे. बदली झालेल्या मुख्याध्यापकांची जागा अद्यापही रिक्त असल्याने एकाच शिक्षकावर सर्व जबाबदारी आहे. प्रशासनाने तात्काळ रिक्त असलेली शिक्षकाची जागा भरणे गरजेचे आहे.
- नंदाराम शेळके, सरपंच, मानोरी बुद्रुक.
(फोटो ०७ येवला १, २)
मानोरी बु. येथे आॅनलाइन शिक्षणाला नेटवर्क मिळत नसल्याने मुप्पीडवार घरोघरी जाऊन स्वाध्याय पुस्तिका वाटप करून अभ्यास करून घेत आहे.