बनावट दस्तावेज करून लाटली जमीन; सख्ख्या भावासह तलाठ्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:23+5:302021-07-04T04:10:23+5:30
सटाणा : सख्ख्या भावाने तलाठ्याच्या मदतीने बनावट दस्तावेज तयार करून परस्पर जमीन नावावर करून घेतल्याचा प्रकार नुकताच आराई येथे ...
सटाणा : सख्ख्या भावाने तलाठ्याच्या मदतीने बनावट दस्तावेज तयार करून परस्पर जमीन नावावर करून घेतल्याचा प्रकार नुकताच आराई येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी तलाठ्यासह सख्ख्या भावावर गुन्हा दाखल केला आहे.
आराई येथील धर्मा हिला सोनवणे व प्रकाश हिला सोनवणे हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत. प्रकाश यांनी धर्मा सोनवणे यांना न समजू देता तलाठ्याशी संगनमत करून आराई शिवारातील शेतजमीन खरेदी- विक्रीचा व्यवहार न करता गट नंबर १६६८, क्षेत्र १ हेक्टर ६० आर पैकी ४५ आर धर्मा सोनवणे यांना कुठलीही कल्पना न देता व त्याचा त्या जमिनीत हिस्सा नसतानादेखील बनावट दस्तावेज तयार केले. त्यानंतर तत्कालीन तलाठी गांगुर्डे यांच्याकडून तक्रारदार धर्मा यांच्या नावाने बोगस सहीचा अर्ज दिला, तसेच तक्रारदारच्या बोगस सहीने शेतजमिनीचे खोटे वाटपपत्र तयार करून तलाठ्याकडे दाखल केले.
या मालमत्तेचे संरक्षण करण्यास तलाठी हे कायद्याने कटिबद्ध असतानाही प्रकाश हिला सोनवणे यांच्याशी संगनमत करून नमुना ९ ची नोटीस तक्रारदारास न बजावता या नोटीसवर बोगस सही करून मालकीची व कब्जे वहिवाटीतील ४५ आर शेतजमीन प्रकाश सोनवणे यांच्या नावावर करून देऊन धर्मा सोनवणे यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात प्रकाश सोनवणे व तत्कालीन तलाठी गांगुर्डे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.