नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी जमिनीची मोजणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 05:37 PM2021-06-04T17:37:52+5:302021-06-04T17:38:00+5:30
नायगाव : प्रस्तावित महत्त्वाकांक्षी नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्षात भूसंपादन मोजणीला सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात सुरुवात झाली ...
नायगाव : प्रस्तावित महत्त्वाकांक्षी नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्षात भूसंपादन मोजणीला सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात सुरुवात झाली आहे. परिसरातील बहुतांश बागायती क्षेत्रातून सुमारे तीनशे मीटर अंतराचे संपादन केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला गेल्या काही दिवसांपासून गती मिळाली आहे. सध्या या मार्गासाठी लागणाऱ्या क्षेत्राच्या संपादनास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि. ४) नायगाव खोऱ्यातील देशवंडी, जायगाव व वडझिरे शिवारात मोजणी करून दिशादर्शक (पोल) लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या तीनही गावातील शिवारात काही ठिकाणी तीनशे, तर काही ठिकाणी दोनशे फूट क्षेत्र संपादन होणार आहे.
नायगाव खोऱ्यातील या गावातील बहुतांश क्षेत्र हे बागायती असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रस्तावित मार्गापासून तीन किलोमीटर अंतरावरून नायगाव शिवारातून आधीही परिसरातून गुळवंच येथील औष्णिक वीज केंद्रासाठी, इंडिया बुल्सच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झाले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या मार्गातील बागायती क्षेत्र वगळण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
-------------------
असा राहणार प्रस्तावित रेल्वेमार्ग
पुणे, हडपसर, वाघोली, कोलवडी, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जबुत, साकूर, अंबोरे, संगमनेर, देवठाण, दोडी, सिन्नर, मुढारी, शिंदे आणि नाशिक रोड असा नवीन रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला आहे. २३५ किलोमीटर अंतराच्या या रेल्वेमार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून सुमारे १,३०० हेक्टर जमीन संपादन केली जाणार आहे. भांबुरवाडी, जैदवाडी (ता. खेड), नांदूर, विठ्ठलवाडी (ता. आंबेगाव), नगदवाडी, संतवाडी (ता. जुन्नर), नांदूर खंदारमाळ, साकूर, बांबळेवाडी, रणखांबवाडी, नांदूर शिंगोटे, सुंदरपूर असे २०.६२ कि. मी. लांबीचे एकूण १२ बोगदे (टनेल) बांधण्यात येणार आहेत. मुळा - मुठा, इंद्रायणी, भामा, भीमा, घोड, मीना, कुकडी, कास, मुळा, प्रवरा, दारणा आदी नद्यांवर मिळून १५ पूल बांधण्यात येणार आहेत. यापैकी सर्वात मोठा २५० मीटर लांबीचा पूल मुळा - मुठा नदीवर बांधण्यात येणार आहे.