कंधाणे-शासनाच्या ग्रामीण तरुणांच्या सहभागातून वृक्षसंवर्धन मोहिमेअंतर्गत बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात बरेच डोंगर वन विभागाने आरक्षित करत स्थानिक नागरिकांच्या सहभागातून या डोंगरावर वनराई फुलवली खरी; परंतु येथे मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड होत आहे. वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली या डोंगरावर निंब, हिवडा, साग, चिंच आदि औषधी व उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यांच्या संवर्धनासाठी गावात दक्षता समितीची स्थापना करण्यात आली. चराईबंदी, कुऱ्हाडबंदीची शपथ घेत वृक्षसंवर्धनाची काळजी घेतली जाऊ लागली. आजमितीस बऱ्याच डोंगरांवर सर्रास जनावरे चरताना दिसत असून, संबंधित विभाग कर्मचाऱ्यांकडून गावाच्या नागरिकांच्या कर्तव्याकडे अंगुलीनिर्देश करून आपली जबाबदारी झटकण्याचा उद्योग सुरू असल्याने नागरिकांनी मोठ्या कष्टाने जगविलेली वनराई कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गुरांच्या पायदळी तुडविली जात आहे.वन विभाग कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील बऱ्याच भागातील वनसंपदा धोक्यात आली आहे. यावर वेळीच उपाययोजना झाली नाही तर इलाजापेक्षा उपचार महाग म्हणण्याची वेळ येऊन ठेपण्यास वेळ लागणार नाही.गावातील हितसंबंध व कर्मचारी वर्गाची उदासीनता यामुळे समितीच्या सदस्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. समितीच्या सदस्यांमागे संबंधित विभागाचे कर्मचारी खंबीरपणे उभे राहिले असते, संबंधितांवर वेळीच कायद्याचा बडगा उचला असता तर कदाचित आज वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते.
मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड
By admin | Published: February 09, 2015 1:42 AM