अखेरचा दिवस बंडखोरांनी गाजवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 07:20 PM2019-10-04T19:20:16+5:302019-10-04T19:22:51+5:30

जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात राजी-नाराजीचे चित्र पहावयास मिळाले असून, त्यात नाशिक पूर्व मतदारसंघातील राजकीय घटनांनी वेगळेच वळण घेतले. भाजपाच्या अखेरच्या यादीतही विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी न देण्यात आल्याने सकाळी त्यांच्या समर्थक व हितचिंतकांनी

The last day was revolted by the rebels | अखेरचा दिवस बंडखोरांनी गाजवला

अखेरचा दिवस बंडखोरांनी गाजवला

Next
ठळक मुद्देराजी-नाराजी नाट्य : शक्तिप्रदर्शनाने आव्हानदिलीप भामरे यांनीही पश्चिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्याच्या दिवसापासून काहीशा थंडावलेल्या राजकीय हालचाली अखेरच्या दिवशी गतिमान होऊन प्रत्येक मतदारसंघात राजी-नाराजीचे प्रदर्शन घडवीत बंडखोरांनी शक्तिप्रदर्शनाने एकमेकांसमोर आव्हान उभे केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही मिनिटांपर्यंत सुरू असलेल्या या नाट्यमयी घटनांमध्ये ऐनवेळी उमेदवार बदलण्याची वेळ राजकीय पक्षांवर आली तर काहींनी बंडखोरी करीत स्वकीयांसमोर आव्हान उभे केले असले तरी, सोमवारी माघारीनंतरच त्यामागचे चित्र स्पष्ट होणार आहे.


जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात राजी-नाराजीचे चित्र पहावयास मिळाले असून, त्यात नाशिक पूर्व मतदारसंघातील राजकीय घटनांनी वेगळेच वळण घेतले. भाजपाच्या अखेरच्या यादीतही विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी न देण्यात आल्याने सकाळी त्यांच्या समर्थक व हितचिंतकांनी सानप यांना उमेदवारीसाठी गळ घातल्याने राष्टÑवादी कॉँग्रेस सानप यांच्यासाठी धावून आली, तर सानप यांच्याऐवजी भाजपाने मनसेचे राहुल ढिकले यांच्या हातात कमळ दिले. ढिकले यांना उमेदवारी व अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनी हजर राहण्याचे आवाहन भाजपाने केले. त्यानुसार सकाळी १० वाजता भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयापासून शक्तिप्रदर्शन करीत ढिकले यांनी अर्ज दाखल केला. या शक्तिप्रदर्शनातून सानप समर्थकांनी मात्र दोन हात राहणेच पसंत केले. दुसरीकडे सानप यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. परंतु राष्टÑवादीचे बहुतेक पदाधिकारी व कार्यकर्ते येवला येथे छगन भुजबळ यांचा अर्ज भरण्यासाठी रवाना झाल्याने स्थानिक मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सानप यांनी नामांकन दाखल केले. या मतदारसंघाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे कॉँग्रेस आघाडीच्या जागावाटपात कॉँग्रेसच्या वाट्याला नाशिक पूर्व मतदारसंघ सोडलेला असताना राष्टÑवादीने सानप यांना अधिकृत ए व बी फॉर्म देऊन उमेदवारी दिली. त्याच दरम्यान, कॉँग्रेसने ही जागा रिपाइंच्या कवाडे गटाला सोडल्यामुळे तेथून रिपाइंचे गणेश उन्हवणे यांनीही अर्ज दाखल केला.
पश्चिम मतदारसंघात शिवसेनेने जाहीर केल्याप्रमाणे सुधाकर बडगुजर, मामा ठाकरे व विलास शिंदे यांनी आपापल्या सिडको-सातपूरमधून रॅली काढली. जागावाटपात हा मतदारसंघ भाजपाला सुटल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेत असंतोष निर्माण झाला असून, सेनेच्या तिघांनी बंडखोरी केली आहे. माघारीपर्यंत तिघा बंडखोरांमध्ये एकमत करण्याचा प्रयत्न केला जाईल व त्यापैकी एक कोणीही उमेदवार असेल, असे तिघांनी संयुक्तपणे जाहीर केले. सेनेच्या इच्छुकांकडून बंडखोरी केली जात असल्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली. त्याचबरोबर भाजपाकडून उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज झालेले दिलीप भामरे यांनीही पश्चिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भामरे हे माजी केंद्रीय संरक्षणमंत्री सुभाष भामरे यांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीला महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने निवडणुकीच्या तोंडावर सेनेतून आलेले नगरसेवक दिलीप दातीर यांना उमेदवारी दिल्याने त्यांनीही अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून कॉँगे्रस आघाडीने माकपा उमेदवार डॉ. डी. एल. कराड यांना पाठिंबा दिलेला असून, कराड यांनी कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या नेत्यांसमक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, परंतु अपूर्व हिरे यांनीदेखील आपण राष्टÑवादीचे उमेदवार असल्याचे सांगून उमेदवारी दाखल केली आहे.

Web Title: The last day was revolted by the rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.