सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली येथील उपबाजार आवारात कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी १०० गोण्यांची आवक झाली. जास्तीत जास्त २५००, किमान ५००, तर सरासरी २ हजार रुपये क्विंटल दराने कांदा विकला गेला.कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पांढुर्ली उपबाजार आवारातील कांद्याचे लिलाव ठप्प होते. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. सभापती लक्ष्मणराव शेळके यांच्याहस्ते दुपारी ४ वाजता शेतीमाल लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. १००० गोण्यांमधून ६०० क्विंटल कांद्याची आवक झाली. पांढुर्ली उपबाजारात यापुढे दर सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी कांदा शेतमालाचे लिलाव सुरू राहतील. शेतकऱ्यांनी उपबाजार आवारात आपला कांदा शेतमाल प्रतवारी करूनच विक्रीसाठी आणावा, शेतकऱ्यांनी मालाची रक्कम रोख स्वरूपात त्वरित लिलावाच्या दिवशीच संबंधीत व्यापाऱ्याकडून ताब्यात घ्यावी, असे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले.लिलावाप्रसंगी बाजार समितीचे माजी उपसभापती उत्तम माळी, सरपंच रमेश सकट, अनिल शेळके, अरुण वाजे, अरुण हारक, बाळासाहेब भोर, खंडेराव वाघ आदी उपस्थित होते. तसेच बाजार समितीचे सचिव विजय विखे, उपसचिव आर. एन. जाधव, इन्चार्ज आर. जे. डगळे, ए. बी. भांगरे यांनी शेतमालाच्या लिलावाचे कामकाज पाहिले.
पांढुर्ली उपबाजारात कांदा लिलावाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 5:40 PM