नाशिक : श्री सप्तशृंगगडावर बसविण्यात आलेल्या फ्यूनिक्युअर ट्रॉलीचे लोकार्पण आता चैत्रोत्सवानंतरच होण्याची चिन्हे असून, सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री व्यस्त असल्यामुळे व चैत्रोत्सवाच्या काळातील गर्दीमुळे लोकार्पण होणे शक्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ट्रॉली बसविण्याचे काम करणाऱ्या कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा व्हावा, असा आग्रह धरून तशी विनंती केली व त्या आधारे ४ मार्च रोजी विधिमंडळ अधिवेशनापूर्वी कार्यक्रम उरकण्याचे नियोजनही करण्यात आले होते. परंतु ऐनवेळी मुख्यमं त्र्यांनी दौरा स्थगित केल्याने सर्व तयारी वाया गेली होती. त्यानंतर १७ मार्च रोजीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला, परंतु मुख्यमंत्र्यांनी येणेच रद्द केले. या ट्रॉलीचे येत्या २५ मार्च रोजी सुरू होणाºया चैत्रोत्सवापूर्वी लोकार्पण करण्याची तयारी करण्यात आली असली तरी, सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा महत्त्वाचा असल्यामुळे येत्या २४ मार्चच्या आत मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री त्यात व्यस्त असल्यामुळे ट्रॉलीचे लोकार्पण होणे शक्य नाही व २५ मार्चपासून चैत्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. यामुळे एप्रिल महिन्यातच आता लोकार्पणाचा मुहूर्त लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सन २००९ पासून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने फ्यूनिक्युअर ट्रॉलीचे काम हाती घेण्यात आले होते. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी याकामी पुढाकार घेऊन ट्रॉलीसाठी तांत्रिक सल्लागार कंपनी नेमून त्याआधारे व्यवहार्यता तपासून पाहिली होती व त्यानंतरच काम हाती घेण्यात आले होते. जमिनीपासून थेट डोंगराच्या उंचीपर्यंत एकाच वेळी ६० भाविकांची ने-आण करणारी ट्रॉली तपासण्यासाठी परदेशी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली.
चैत्रोत्सवानंतरच ट्रॉलीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:24 AM