नांदगाव : सेवानिवृत्तीचे वेध लागल्याने तहसीलदार यांच्याकडून घाईघाईने कायदेशीर निर्णय घेतले जाणार नाहीत, किंबहुना अनेक प्रकरणात तसे घडत असल्याचा आक्षेप घेऊन तहसीलदार यांच्यावर अविश्वास दर्शविणारा ठराव संमत करीत महसुली अर्धन्यायिक प्रकरणी बहिष्काराचा निर्णय वकील संघाने घेतल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, वकील संघाच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी पुढील कामकाजासाठी आपल्या निवृत्ती नंतरच्या तारखा दिल्या आहेत.
तहसीलदार उदय कुलकर्णी हे येत्या ३१ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कायदेशीर बाजू न पाहाता अगर कोणत्याही प्रकारचा पुरावा योग्य प्रकारे न बघता, घाईघाईने त्या प्रकरणांचा निकाल करीत असल्याबाबत पक्षकार व वकील वर्गाने नांदगाव वकील संघाकडे आलेल्या तक्रारीवरून तातडीची बैठक घेऊन तहसीलदारांनी कोणताही निकाल देऊ नये याबाबत सर्वसंमतीने ठराव मंजूर केला.
वकील संघाचे अध्यक्ष ॲड. गजानन सुरसे यांच्या नेतृत्वाखाली वकिलांच्या शिष्टमंडळाने कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदविले. त्यावर कुलकर्णी यांनी पक्षकारांना न्याय मिळावा व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व्हावा यासाठी आपण तारखा देत होतो. मात्र, आपल्यावर पक्षकारांच्या वकिलांच्यावतीने अविश्वास दाखविण्यात आल्यामुळे आपल्या निवृत्तीच्या नंतरच्या तारखा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले.
इन्फो
सर्व प्रकरणे शेतकऱ्यांसंबंधी
मागच्या आठवड्यात जमाबंदी विभागाचा कारकून लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकल्याची घटना उघडकीस आली. त्याचा संदर्भ वकील संघाने आपल्या निवेदनात दिला. या कार्यालयातील सर्व प्रकरणे शेतकरी वर्गाची असून तहसीलदार यांनी कायदेशीर बाजू न पाहाता घाईघाईने निकाल दिल्यास शेतकऱ्याला मोठा त्रास होऊ शकतो. असे म्हणणे सादर केले. ॲड. जे. आर. कासलीवाल, ॲड. ए. के. शिंदे, ॲड. वाय. आर. शेख, ॲड. बी आर चौधरी, ॲड. रवी परशुरामी, ॲड. विजय रिंढे, ॲड. एस जे घुगे, ॲड. पी. एम. घुगे,ॲड. बी. बी. विन्नर, ॲड. सचिन साळवे, ॲड. बी. आर. आढाव, ॲड. पी. एस. पवार, ॲड. आर. एम. आहेर, ॲड. एस. एम. वाळेकर, ॲड. डी. एन. आहेर, ॲड. पी. आर. दौंड, ॲड. एस. एम. काकड, ॲड. एस. व्ही. पाटील, ॲड. एम. पी. पाटील आदी वकिलांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.