महिला दिनीच मुलीचे अर्भक टाकून पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 02:09 AM2019-03-09T02:09:23+5:302019-03-09T02:09:43+5:30
जागतिक पातळीवर महिला दिन विविध उपक्रम व कार्यक्रमांनी साजरा करून महिलांचे गुणगान केले जात असताना शहरालगतच्या पांडवलेण्याच्या पायथ्याशी एका महिलेने आपले स्वत:चे स्त्री जातीचे अर्भक अक्षरश: सोडून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला आहे.
इंदिरानगर : जागतिक पातळीवर महिला दिन विविध उपक्रम व कार्यक्रमांनी साजरा करून महिलांचे गुणगान केले जात असताना शहरालगतच्या पांडवलेण्याच्या पायथ्याशी एका महिलेने आपले स्वत:चे स्त्री जातीचे अर्भक अक्षरश: सोडून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला आहे. पांडवलेणी सर करीत असताना एका वाटसरूला अर्भकाच्या रडण्याचा आवाज आल्याने तत्काळ त्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पांडवलेण्याच्या पायथ्याशी दुपारी २ वाजेच्या सुमारास लहान बालकाच्या रडण्याचा आवाज येथील व्यावसायिक सचिन घुगे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले तर याठिकाणी एका पांढऱ्या कपड्यात स्त्री जातीचे बाळ दिसले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना व व्यावसायिकांना बोलावून या बाळाच्या पालकांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. मात्र त्याठिकाणी बालक आमचे नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता या बालकाचे काय करायचे? असा विचार करून नागरिकांनी इंदिरानगर पोलिसांना माहिती दिली. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या अर्भकास ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
कारवाईची मागणी
पोलिसांनी घुगे यांच्या फिर्यादीवरून अर्भकाला बेवारस सोडून जाणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशीच एका मातेने आपले एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक अशा पद्धतीने सोडून जाणे म्हणजे अत्यंत निंदनीय प्रकार असल्याने पोलिसांनी या बालकांच्या पालकांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.