नाशिक : तालुक्यातील बाबळेश्वर व पिंपळगावचे नेहेरे अन् शिंगाडे हे दोन्ही कुटुंब कन्यारत्न प्राप्तीचा आनंदात... नियतीला मात्र त्यांचा हा आनंद मान्य नसावा... आपल्या तान्हुल्या बहिणीला बघून हर्र्षाेल्हासित झालेल्या चिमुकल्या गुंजनवर मंगळवारी (दि.१६) रात्री अचानकपणे काळाने झडप घातली. बिबट्याने गुंजनला जबड्यात धरून ऊसात ओढून नेल्याने ती जागीच गतप्राण झाली अन् या दोन्ही कुटुंबांवर अचानकपणे आभाळ फाटले...!
हसरा व चंचळ स्वभावाची गुंजन ही कुटुंबियांची मोठी लाडकी होती. ती बालवाडीत मोठ्या आनंदाने जात असे आणि घरी आल्यावरही तिच्या हातात नेहमीच पाटी-पेन्सिल राहयाची. यावरून तिला अभ्यासात रुची असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. वडील दशरथ मोलमजुरी करतात तर आई शिल्पा या गृहिणी. जानोरी गावात राहणाऱ्या या नेहेरे कुटुंबियांना तीन वर्षांपुर्वी गुंजनच्या रूपाने पहिले कन्यारत्न लाभले. त्यानंतर गेल्या रविवारी या कुटुंबात पुन्हा एका तान्हुलीचे आगमन झाले. त्यामुळे दोन्ही कुटुंबिय आनंदात होते. गुंजन वडिलांसोबत बाबळेश्वर येथील मामा बबन राजाराम शिंगाडे यांच्याकडे आईसोबतच आली होती. आई प्रसुतीसाठी दवाखान्यात दाखल असल्याने गुंजन वडिलांसोबत जाऊन लहान्या छकुली अन् आईला मंगळवारी भेटून आली; मात्र तीची ही भेट अखेरची ठरेल, असे कोणालाही वाटले नव्हते.दोन्ही कुटुंब अत्यंत हातावरचे असून मिळेल ती मोलमजुरीची कामे करून आपला उदरनिर्वाह चालवितात. बिबट्याच्या अचानकपणे हल्ल्याने या कुटुंबांवर मोठा आघात झाला असून या धक्क्यातून ते सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. नियतीचा हा खेळ या कुटुंबियांसह कोणालाही लक्षात न येणारा असाच आहे. या दुर्घटनेने मोहगाव ग्रामपंचायतीमधील बाबळेश्वरसह अवघी पंचक्रोशी सुन्न झाली आहे. भविष्यात असे दुर्देवी अन् मनाला सुन्न करणारे हल्ले टाळण्यासाठी ऊसशेतीच्या जवळ असलेल्या गावातील गावकऱ्यांनीसुध्दा अधिकाधिक सजग राहून आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याची गरज आहे.‘त्या’ चिमुकल्यांचे दैव बलवत्तरगुंजन आपल्या मामाचे मुलगी वैष्णवी (६) व कार्तिक (३) यांच्यासोबत घराच्यापुढे खेळण्यात दंग होती. दोन घरांच्या बोळीतून अचानकपणे बिबट्या चाल करून आला आणि त्याने तत्काळ गुंजनवर झडप घेत तिला जबड्यात धरून ऊसाकडे धूम ठोकली. वैष्णवी कार्तिकला घेऊन तत्काळ घरात शिरली अन‘ बाबा, बाबा आपल्या गुंजनला वाघ घेऊन गेला...’ असे रडक्या आवाजात सांगितले. यावेळी या चिमुकल्यांच्या अश्रूधारा थांबता थांबत नव्हत्या.