नाशिक : मखमलाबाद हे शहराच्या लोकवस्तीजवळील गाव असून या भागात बिबट्याचा वावर असणे ही धोक्याची बाब आहे, यामुळे मखमलाबाद परिसरात बिबट्याच्या संचाराविषयीची वार्ता ऐकल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले. वनरक्षक, वनपाल यांच्या चमूने तत्काळ मखमलाबाद परिसरात जाऊन पाहणी केली. या भागातील नागरिकांशी संवाद साधत मळे परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्याचा वावर असल्याचे पुरावे आढळून आले नाही. बिबट्या मखमलाबाद पासून काही किलोमीटरवर असलेल्या दरी-मातोरी-मुंगसरा या गावांच्या शिवारात संचार करत असल्याचे स्पष्टीकरण वनविभागाच्या पश्चिम कार्यालयाच्या सुत्रांनी दिले आहे.मखमलाबाद गावात बिबट्या आढळून येणे किंवा त्याचा वावर असल्याचे पुरावे आढळून येणे ही धक्कादायक बाब आहे; मात्र असे काहीही वनविभागाला पाहणीदरम्यान आढळून आलेले नाही. त्यामुळे या भागात पिंजरा तैनात करण्याचा प्रश्न येत नसल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी सांगितले. मातोरी-मुंगसरा भागात दोन पिंजरे योग्य ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती खैरनार यांनी दिली. या भागात सातत्याने वनपाल, वनरक्षकांची गस्त सुरूच असून नागरिकांशी संवाद साधत शेतमळ्यांच्या परिसरात भेटी दिल्या जात आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे अफवा पसरवू नये, वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन खैरनार यांनी केले आहे. गंगापूर धरणाचा परिसर व डावा कालवा आणि लपणसाठी भरपूर नैसर्गिक अधिवास या भागात असल्यामुळे बिबट्याचा वावर पुर्वीपासून येथे आढळतो. त्यामुळे भयभीत होण्याचे कारण नाही. बिबट्या नागरी वस्तीकडे येणार नाही, यासाठी संपुर्ण खबरदारी घेतली जात आहे.
मखमलाबाद परिसरातील गावक-यांनी तसेच दरी, मातोरी, मुंगसरा या भागातील नागरिकांनी सुध्दा आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरू न उकिरड्यांभोवती मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढणार नाही. तसेच डुकरांची वाढती संख्याही नियंत्रीत ठेवावी. कुत्री, डुकरे हे बिबट्याला आकर्षित करणारे भक्ष्य आहेत, हे लक्षात घ्यावे. बिबट्यासाठी हे दोन्ही प्राणी अत्यंत सोपी शिकार ठरतात. त्यामुळे जेथे कु त्री, डुकरांचा वावर जास्त असतो तेथे बिबट्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही खैरनार म्हणाले.