मातोरी : आळंदी धरणानजीकच्या जुने धागूर परिसरात एका द्राक्ष बागेत भर दिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात वनविभागालाही कळविण्यात आल्याने त्यांनीही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जुने धागूर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील कुत्रे व शेळ्या अज्ञात जनावरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी होत असल्याने लांडगा किंवा कोल्हा असावा, असा गावकऱ्यांचा समज होता. त्यामुळे फारशी काळजी घेतली जात नव्हती. मात्र, आळंदी धरण येथील रहिवासी बाळासाहेब वाघमारे यांच्या द्राक्ष बागेत ते स्वतः तसेच त्यांचे मजूर बागेचे काम करत असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास बागेत बिबट्या दिसून आला. त्यावेळी वाघमारे यांनी मजुरांना बागेतून सुरक्षित बाहेर काढले. बिबट्याच्या भर दिवसा वास्तव्याने त्याची खबर दिंडोरी वन विभागास देण्यास आली. काही वेळातच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत, सविस्तर पाहणी करून संबंधितांकडून माहिती घेतली. बिबट्या एकटा आहे की अजून त्याला जोडीदार आहे. नर आहे की मादी याचा उलगडा होऊ शकला नसल्याने पिंजरा लावता येणार नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.
दरम्यान, बिबट्याच्या वास्तव्याच्या माहितीने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी शेतात कामाला जाण्यासही घाबरू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी लहान मुलांची तसेच जनावरांची काळजी घेत सायंकाळनंतर घराबाहेर पडू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.