घोरवड शिवारात बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 01:01 AM2022-03-04T01:01:19+5:302022-03-04T01:01:47+5:30
सिन्नर तालुक्यातील घोरवड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे.
सिन्नर: तालुक्यातील घोरवड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. घोरवड शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता. या परिसरात जंगल व पाण्याचा भाग असल्याने या परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गाव परिसरातही बिबट्याचा मुक्त संचार वाढला होता. यामुळे रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी बाहेर पडणेही अवघड झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांकडून परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाकडून सागाडी परिसरात सोनांबे-घोरवड रस्त्यानजीक असलेल्या पवार पोल्ट्रीफार्मजवळ निवृत्ती महिपत हगवणे व तुकाराम बाबुराव हारक यांच्या शेतात पिंजरा लावला होता. रात्रीच्या सुमारास हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना अलगत पिंजऱ्यात जेरबंद झाला. सकाळी याबाबत लक्षात येताच शेतकऱ्यांनी वनविभागाच्या सेवकांना माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, वनपाल कैलास सदगीर, बाबुराव सदगीर यांनी बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात हलविण्याची कार्यवाही केली